Pune: दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा का होत नाही? आतली बातमी फुटली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची खासगीत चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनीही काही नेत्यांना फोन करून आघाडीसंदर्भातील मते जाणून घेतली.
पुणे : एकेकाळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर असलेली राष्ट्रवादीची मजबूत पकड आणि त्यातून मिळालेली सत्ता २०१७ साली भाजपने हिसकावून घेतली. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि महत्त्वाची नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. आता तोच बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची बोलणी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यापासून अनेक महत्त्वाच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली असून या अंतिम निर्णयावर २६ डिसेंबरला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची खासगीत चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनीही काही नेत्यांना फोन करून आघाडीसंदर्भातील मते जाणून घेतली. काही नेते आघाडीला अनुकूल आहेत. मात्र प्रशांत जगताप यांच्यासारखे नेते आणि काही पदाधिकारी भाजप सोबत असलेल्या अजित पवार यांच्याशी आघाडी होऊ नये या मताचे आहेत. असे असले तरी आघाडीची घोषणा चिन्हाबाबतच्या संभ्रमामुळे थांबली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
advertisement
दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा का होत नाही?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना उमेदवारांनी घड्याळ चिन्हावरच लढावे, असे अजित पवार यांच्या पक्षाचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला सामोरे जावे, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या निर्णयाला शरद पवार यांच्या पक्षातील काहींचा विरोध आहे. असे झाले तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यासारखेच होईल, असे त्यांना वाटते. आघाडीपर्यंत ठीक आहे पण तुतारी चिन्हाबाबत समझोता करणार नाही, या निर्णयावर ठाम असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
advertisement
आघाडीवर खासगीत शिक्कामोर्तब आणि प्रशांत जगताप यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी होणार असल्याचे थेटपणे संकेत त्यांनी दिले. पुणे शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्यांच्याही भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेणार आहोत असे सांगत अजित पवार यांच्या पक्षासोबत होत असलेले आघाडीचे त्यांनी समर्थन केले. पण त्याचवेळी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
advertisement
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे निष्ठावान पदाधिकारी, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पक्षाची पुरोगामी भूमिका ठसवून सांगण्याचा प्रयत्न करीत सद्वविवेक बुद्धीला स्मरून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत बसले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी नको अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यांची ही भूमिका पक्षातील नेत्यांना मान्य न झाल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 9:05 PM IST










