Raj Thackeray Ambernath Nagar Parishad : उमेदवारी अर्जाची मुदत संपण्याच्या काही तास आधी राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, अंबरनाथमध्ये मोठी खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
Raj Thackeray Local Body Election : आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार आहे. ही मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
ठाणे: राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार आहे. ही मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतला आहे. मनसेने अंबरनाथची निवडणूक अधिकृतपणे लढवू नये, असा आदेश थेट 'शिवतीर्था'वरून देण्यात आला असून, या निर्देशामुळे अंबरनाथमधील मनसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले की, मनसेची अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा देण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय अचानक येताच स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अक्षरशः संभ्रमात सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून प्रबळ उत्साहाने प्रचाराची तयारी करणाऱ्या मनसैनिकांसमोर आता ‘नेमके लढायचे कुठून? कोणाच्या पाठिंब्यावर? कोणत्या गटाशी किंवा आघाडीसोबत समन्वय करायचा?’ असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
advertisement
दरम्यान, आजच निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने परिस्थिती अधिकच ताणतणावपूर्ण झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त काही तास उरले असताना, संभाव्य उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार, स्थानिक पातळीवर त्यांना कोणती गटबांधणी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे मनसैनिकांमध्ये धावाधाव सुरू असून, अनेकजण पर्याय शोधण्यात गुंतले आहेत.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेने घेतलेल्या निर्णयाने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेच्या अधिकृत अनुपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी पक्षांचे गणित बदलू शकते, तसेच मतांचे विभाजन कोणाच्या फायद्यात जाणार यावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
advertisement
आता काही तासांत मनसैनिक कोणती भूमिका घेतात आणि अंबरनाथच्या निवडणुकीत नवीन समीकरणे कशी आकार घेतात, हे पाहणे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
November 17, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray Ambernath Nagar Parishad : उमेदवारी अर्जाची मुदत संपण्याच्या काही तास आधी राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, अंबरनाथमध्ये मोठी खळबळ


