advertisement

Raj Thackeray: 'AI च्या काळात आता...', मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, मराठीजनांना दिला 'राजमंत्र'

Last Updated:

Raj Thackeray : आज 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत महत्त्वाची पोस्ट लिहित मराठीजनांना, मराठी भाषा प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.

'AI च्या काळात आता...', मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, मराठीजनांना दिला 'राजमंत्र'
'AI च्या काळात आता...', मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, मराठीजनांना दिला 'राजमंत्र'
मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत महत्त्वाची पोस्ट लिहित मराठीजनांना, मराठी भाषा प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. एरवी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आक्रमक होणाऱ्या राज ठाकरेंनी आज 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) आणि 'डेटा' या आधुनिक शस्त्रांच्या जोरावर मराठी भाषेचे वर्चस्व जगभरात निर्माण करण्याचा नवा मंत्र दिला आहे.

डेटा हीच नवीन शक्ती, मराठी मागे पडू नये!

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, "दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला तेव्हा जमीन महत्त्वाची होती, औद्योगिक क्रांतीत मशिन्स आले, आणि आता 'एआय'च्या युगात डेटा (विदा) हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या भाषेतून सर्वात जास्त डेटा तयार होईल, ती भाषा जगात शक्तिशाली ठरेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
advertisement

"नोकऱ्यांची भीती नको, साम्राज्य उभं करण्याची संधी!"

एआयमुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात असताना राज ठाकरेंनी सकारात्मक बाजू मांडली. "मराठी माणसाने हे तंत्रज्ञान आत्मसात केले, तर तो स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो. जगातील बलाढ्य कंपन्या गेल्या २०-३० वर्षांतच उभ्या राहिल्या आहेत, ते मराठी तरुणांनाही शक्य आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement

>> राज ठाकरेंनी काय म्हटले?

आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
advertisement
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
advertisement
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
advertisement
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
advertisement
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: 'AI च्या काळात आता...', मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, मराठीजनांना दिला 'राजमंत्र'
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement