Nirmalya Recycling: बाप्पाच्या निर्माल्याचा बळीराजाला फायदा, श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेल्या हारांचं काय होतं?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Nirmalya Recycling: गणेशभक्त आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार बाप्पाच्या चरणी फुलं, हार, नारळ आणि दुर्वा अर्पण करतात.
पुणे: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पुण्यात मोठ्या दणक्यात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. पुण्यातील गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सर्वात जास्त चर्चा होते. या गणपतीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो गणेशभक्त पुण्यात येतात. हे भक्त आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार बाप्पाच्या चरणी फुलं, हार, नारळ आणि दुर्वा अर्पण करतात. या गोष्टी काही काळातच निर्माल्य म्हणून बाजूला देखील केल्या जातात. अशा प्रकारे दगडूशेठ गणपतीजवळ दररोज सुमारे एक टन निर्माल्य जमा होतं. हेच निर्माल्य बळीराजाच्या आयुष्यात निखळ आनंदाचं कारण ठरत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 'रोटरी क्लब ऑफ पुणे युवा' ही संस्था दगडूशेठ गणपतीमंडळात जमा झालेल्या निर्माल्याचा अतिशय चांगला वापर करत आहे. ही संस्था गणरायाच्या पुजेतून निर्माण झालेल्या एक टन निर्माल्यापासून 300 किलो खताची निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे हे खत शेतकऱ्यांना मोफत वितरीत केलं जात आहे. गेल्या 9 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
advertisement
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे जमा होणारं निर्माल्य डीपी रोडवरील जोशी किचन जवळ उभारलेल्या 'निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पा'त जमा केलं जातं. या प्रकल्पात निर्माल्याची पावडर करून त्याचं सेंद्रिय खतात रुपांतर होतं. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना या सेंद्रिय खताचं विनामूल्य वाटप केलं जातं. दररोज एक टन निर्माल्यापासून साधारण 300 किलो खताची निर्मिती केली जाते.
advertisement
रोटरी क्लबचे निनाद जोग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत गणेशोत्सवात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खताची निर्मिती करतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं यामध्ये मोठे सहकार्य मिळतं. गणोशोत्सवात दररोज सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान टेम्पो त्यांच्याकडे पोहोचतो आणि वीस पोती म्हणजे साधारण एक टन निर्माल्य घेऊन येतो. यापासून तयार होणारं खत गरजू शेतकरी आणि सोसायट्यांना विनामूल्य दिलं जातं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nirmalya Recycling: बाप्पाच्या निर्माल्याचा बळीराजाला फायदा, श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेल्या हारांचं काय होतं?