गंभीर प्रकार... कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनीच नेमले एजंट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनीच एजंट नेमल्याचा आरोप माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी केला आहे.
राहुल खंडारे, बुलडाणा : बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत असून कामगार विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एजंटांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत गोरगरिबांची लूट करणे सुरू असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे.
बांधकाम कामगारांना कामगार महामंडळाकडून घरगुती वापराची भांडी व इतर साहित्याची किट देणे सुरू आहे. प्रत्यक्ष बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. परंतु, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यांचा कारभार पाहणारे देशमुख नामक कामगार अधिकारी आणि त्यांचे इतर सहकारी यांनी नेमलेल्या खाजगी एजंटांच्या मार्फतच प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन ते ऑनलाइन नोंदणी करत आहेत. नोंदणी झालेल्यांमध्ये अपात्र व्यक्तींचा जास्त भरणा आहे, अशी माहिती संजय रायमुलकर यांनी दिली आहे.
advertisement
गेल्या वर्षभरामध्ये सदर एजंटांनी कामगार अधिकाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली असून ज्यांच्याकडे शेती आहे, ट्रॅक्टर आहे असे लोक आणि व्यावसायिक असलेल्यांनाही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी व कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर बैठक लावण्यात यावी, अशीही मागणी संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार कामगार मंत्री असलेले आकाश फुंडकर यांच्या जिल्ह्यात सुरू आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
June 21, 2025 6:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गंभीर प्रकार... कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनीच नेमले एजंट