तो Video नेमका कुठला? जमिनीचे प्रकरण काय? नार्वेकरांचा संबंध काय? राऊतांचे सनसनाटी दावे
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत राहुल नार्वेकर दिसून येत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. अखेर त्यांनीच व्हिडीओबाबतचे सनसनाटी खुलासे केले.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओत एक शेतकरी कुटुंब आपल्या जमिनीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना भांडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कित्येकदा सांगूनही ऐकत नसल्याच्या मुद्द्यावरून महिलेने एका अधिकाऱ्याच्या मुस्कटातही मारल्याचे दिसून येते. या व्हिडीओत राहुल नार्वेकर दिसून येत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. अखेर संजय राऊत यांनी व्हिडीओबाबतचे सनसनाटी खुलासे केले.
कोकणातील मोक्याच्या जमिनी गुजरात लॉबीला विकण्याचा धंदा
राऊत म्हणाले, गेल्या काही काळापासून अलिबागलमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन गुजरात लॉबीला विकण्याचा धंदा जोरात सुरू आहे. मोठ मोठे बिल्डर गुंतवणूकदार जमिनी घेत आहेत. नार्वेकर बंधू या जमिनी शेतकऱ्यांनी विकाव्यात, यासाठी अथक परिश्रम घेतायेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल कार्यालयावर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर दबाव आणत आहेत. याची माहिती त्यांना हवी असेल तर मी द्यायला तयार आहे. त्यांच्या व्यवहाराशी माझा संबंध नाही. परंतु आमच्या मराठी माणसाच्या कोकणातील जमिनी ज्या पद्धतीने हिसकावून घेतल्या जात आहेत, फूस लावून जमिनी दाब्यात घेऊन, अलिबागचा गुजरात करणे हे उद्योग सुरू आहेत, याचा भडका व्हिडीओत दिसेल, असे राऊत म्हणाले.
advertisement
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे?
अलिबागमधील म्हात्रोळी गावातल्या एका शेतात राहुल नार्वेकर हे महाशय मोजणीसाठी सरकारी अधिकारी घेऊन गेले. ही जागा गुजरातच्या एका उद्योगपतीला फार्म हाऊसाठी नजरेत भरली. त्या जागेचे मालक घरात नसताना, हे सरकारी अधिकारी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली घुसले, मोजणी सुरू केली. कुटुंबियांना जेव्हा कळाले की आपण नसताना मोजणी सुरू आहे तेव्हा ते तिकडे आले. व्हिडीओत अर्धवट दिसतंय, पण त्याआधी माऊलीने कुणाकुणाच्या कानफटीत मारल्या, याचा व्हिडीओ थोड्याच वेळात येईल.
advertisement
जमिनी विकण्यासाठी दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपलं
अधिकाऱ्यांना मारहाण झाली, कारण आमच्या जमिनी तुम्ही हिसकावून घेत आहात. रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गात तेच सुरू आहे. पालघर भागात तेच सुरू आहे. भाजपचे लोक इकडे आणण्याचे काम राहुल नार्वेकर करतायेत. या माध्यमातून कोकणचे स्मशान करण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले.
मी त्या कुटुंबाचे अभिनंदन करतो, त्यांनी महाराष्ट्राला दाखवले, या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची पात्रता काय आहे? देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यात काय चाललंय? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपण सामान्य जनतेच्या पेटीचे, घरांचे, संपत्तीचे चौकीदार आहात. तुमच्या मंत्रिमंडळातले, विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारचे वर्तन करतायेत. भांडण सोडवायला गेलो होतो, असे ते सांगतायेत. ते पूर्णपणे खोटे बोलतायेत. तुम्हाला बोलावले कुणी होते? त्या आडवळणाला तुम्ही कशाकरिता गेलात? शनिवार-रविवार हे महाशय जमिनीची पाहणी करायला तिकडेच असतात. त्यांचे आणि माझे उत्तम संबंध आहेत, पण ते जे करतायेत, हे चांगले नाही, असे राऊत म्हणाले.
advertisement
आरोपांवर राहुल नार्वेकर काय म्हणाले?
माझा त्या व्हिडीओशी काहीही संबंध नाही. तिकडे भांडण सुरू होते. ते भांडण सोडविण्यासाठी मी गेलो होतो, असे सांगून आपल्यावरील आरोपाचे खंडन राहुल नार्वेकर यांनी केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तो Video नेमका कुठला? जमिनीचे प्रकरण काय? नार्वेकरांचा संबंध काय? राऊतांचे सनसनाटी दावे









