Satara ZP Election: साताऱ्यात ZP अध्यक्ष निवडीवेळी राडा, शंभूराज देसाईंना धक्काबुक्की, ZP सदस्य पोलिसांच्या ताब्यात, भाजपवर शिंदे गट संतापला
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Satara ZP Election: निवडणुकीत झालेल्या राड्यानं महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडू लागली आहे. शिंदे गटाचे नेते, राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की घडल्याचा प्रकार घडला. इतकंच नाही तर शिंदे गटाच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सातारा: गेल्या महिनाभरापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या हाय-व्होल्टेज ड्रामाचा अखेर भाजपच्या विजयाने थरारक शेवट झाला. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यानं महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडू लागली आहे. शिंदे गटाचे नेते, राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की घडल्याचा प्रकार घडला. इतकंच नाही तर शिंदे गटाच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचा परिणाम मतदानावर झाला. या सगळ्या प्रकारावर शिवसेना शिंदे गटात संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेच्या हव्यासापोटी भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाकडून होत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सत्तेत मित्रपक्ष असले तरी, साताऱ्यात मात्र भाजपने चक्क शिवसेनेच्याच मंत्र्याला पोलिसी बळाचा वापर करून धक्काबुक्की केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्र्याला धक्काबुक्की आणि सदस्यांची पळवापळवी
advertisement
सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून सत्तेचा सर्रास गैरवापर झाल्याचे पाहायला मिळाले असल्याचा आरोप होत आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांच्या उपस्थितीत धक्काबुक्की करण्यात आली. इतकेच नाही तर शिवसेनेच्या गोटातील दोन सदस्यांना चक्क सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने "ही निवडणूक आहे की पोलिसांच्या बळावर केलेली सत्ता बळकावण्याची मोहीम?" असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
शिवसेनेच्या पाठीत खंजीर?
या प्रकारामुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "भाजपने सत्तेसाठी आपल्याच मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे," अशी भावना स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. साताऱ्यातील या 'हाय व्होल्टेज' राड्यामुळे महायुतीमधील दरी आता अधिक रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एक मताने भाजपचा विजय...
सातारा जिल्हा परिषदेत भाजप हा २७ जागांवर विजयी झाला होता. साताऱ्यात हा मोठा पक्ष ठरला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना शिंदे गटाला १५ जागा मिळाल्या. तर, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागा मिळाली असून एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती.
advertisement
आज झालेल्या मतदानात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना ३३ तर मनीषा फडतरे यांना ३२ मते मिळाली. भाजपच्या प्रिया शिंदे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांना ३३ मते मिळाली. निवडीच्या वेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे सगळे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 3:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara ZP Election: साताऱ्यात ZP अध्यक्ष निवडीवेळी राडा, शंभूराज देसाईंना धक्काबुक्की, ZP सदस्य पोलिसांच्या ताब्यात, भाजपवर शिंदे गट संतापला








