नितीश कुमार बाहेर पडले तरी मोदी सरकार सुरक्षित, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Jayant Patil on Nitish Kumar : नितीश कुमार बाहेर पडले तरी केंद्र सरकार सुरक्षित आहे, अशा आशयाचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे
विशाल पाटील, प्रतिनिधी कराड: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल, अशा चर्चा सुरू आहेत. बिहारचं नेतृत्व कुणी करायचं? यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षात शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. तेव्हा पासून नितीश कुमार एनडीएमध्ये नाराज असल्याचं बोललं जातंय. शिवाय नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले, तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकतं, अशा चर्चा सुरू आहेत.
याबाबतचं थेट वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील केलं होतं. केंद्रात भाजप नितीश कुमार यांचे 10 खासदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येऊ शकतं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. पण राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केलं आहे. नितीश कुमार बाहेर पडले तरी केंद्र सरकार सुरक्षित आहे, अशा आशयाचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
advertisement
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, "नितीश कुमारांकडे एकूण 12 खासदार आहेत. ते 12 खासदार बाहेर गेले तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल, असं दिसत नाही. त्यांच्याकडे सध्या 291 च्या आसपास बहुमत आहे. त्यामुळे नितीश कुमार बाजुला झाल्याने केंद्र सरकार अल्पमतात येईल, असं मला आकड्यांवरून तरी वाटत नाही. नितीश कुमारांना एकट्याला हा निर्णय घेता येणार नाही. त्यांच्यासोबत आणखी दोन-तीन मोठे खासदार असलेले पक्ष आहेत. त्या दोघा-तिघांनी निर्णय घेतला तर सरकार अल्पमतात येईल, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
advertisement
संजय राऊत काय म्हणाले होते?
नितीशकुमार यांच्या पक्षाचे दहा खासदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपवर पक्ष फोडण्याचे आरोप होत आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत असे राजकारण करत आहे, ही चिंतेची बाब आहे. या स्थितीमुळे नितीशकुमार नाराज असून त्याचा परिणाम त्यांच्या राजकारणावर होऊ शकतो. भाजपसोबत राहणारा, त्यांच्याशी मैत्री करणारा, त्यांना मदत करणारा, त्यांच्याशी बेईमानी करणारा हा भाजपचा चेहरा आहे. जेडीयूचे 10 खासदार भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे नितीश कुमार खूप अस्वस्थ आहेत आणि काही वेगळे निर्णय घेऊ शकतात.
Location :
Karad,Satara,Maharashtra
First Published :
January 05, 2025 10:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
नितीश कुमार बाहेर पडले तरी मोदी सरकार सुरक्षित, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य