घरी नवरा, बाहेर 2 बॉयफ्रेंड, साताऱ्यात अनैतिक संबंधातून महिलेचा खूनी खेळ, सतीश हकनाक मेला!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका २७ वर्षीय तरुणाची अनैतिक संबंधांच्या वादातून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक खळबळजनक एक घटना समोर आली आहे. इथं एका २७ वर्षीय तरुणाची अनैतिक संबंधांच्या वादातून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिले. या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे.
नेमकी घटना काय?
सतीश उर्फ आप्पा दादासाहेब दडस असं हत्या झालेल्या २७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील रहिवासी होता. सतीशचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. मात्र, याच महिलेचे तिच्या पतीव्यतिरिक्त आणखी एका प्रियकराशीही संबंध होते. या 'प्रेमाच्या चौकोणातून' सतीशची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तिचा पहिला प्रियकर आणि पतीच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला म्हणजेच सतीशला संपवण्याचा कट रचला. आरोपींनी सतीशची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्यानंतर हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी त्यांनी मृतदेहाचे लाकूड कापायच्या मशीनने तुकडे केले. हे सर्व तुकडे पोत्यात भरून ते परिसरातील नदी आणि एका शेततळ्यात फेकून दिले.
advertisement
सतीश बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला, तिचा पती आणि तिचा पहिला प्रियकर अशा तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी आणि नदीपात्रात मोठी शोधमोहीम राबवून मृतदेहाचे फेकलेले अवशेष हस्तगत केले आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरी नवरा, बाहेर 2 बॉयफ्रेंड, साताऱ्यात अनैतिक संबंधातून महिलेचा खूनी खेळ, सतीश हकनाक मेला!










