मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे, शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत अमराठी मते ही निर्णायक ठरू लागल्याने त्यांची कड घेण्याच्या प्रयत्नात खुद्द मायमराठीच्या मरणाची इच्छा शिंदे सेनेच्या आमदाराने व्यक्त केली.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना उत्तर भारतीयांची कड घेण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी खुद्द मायमराठीच्या मरणाची इच्छा व्यक्त केली. मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे. कारण ती जास्त प्रेम करते, असे संवेदनाहीन विधान प्रकाश सुर्वे यांनी केले आहे. विरोधी पक्षांनी प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे. प्रकाश सुर्वे यांचे वक्तव्य हा प्रत्येक मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचे विरोधक म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीत अमराठी मते ही निर्णायक ठरू लागल्याने सत्ताधारी पक्षांचा डोळा हा त्याच मतांवर असतो. याच पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समूहाच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश सुर्वे यांनी अमराठी लोकांचे गुणगाण गाताना चक्क मराठी मेली तरी चालेल, असे वक्तव्य केले. महापालिका निवडणुकीत अमराठी लोकांनी मतदान करावे या उद्देशाने त्यांनी चक्क आईच्या मरणाची इच्छा व्यक्त करून अमराठी मावशी जगावी, असा आशावाद व्यक्त केला.
advertisement
प्रकाश सुर्वे नेमके काय म्हणाले?
मराठी ही मातृभाषा आहे, माझी आई आहे. पण उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल परंतु मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. खरे तर आईपेक्षाही मावशी जास्त लळा लावते, अशी मुक्ताफळे प्रकाश सुर्वे यांनी उधळली.
advertisement
अमराठी, उत्तर भारतीय लोकांनी मला नेहमीच प्रेम दिले, आशीर्वाद दिले. तुमचे असेल प्रेम आणि आशीर्वाद माझ्या सहकाऱ्यांनाही द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या उत्तर भारतीय लोकांना केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमराठी मतांची मर्जी आपल्यावर राहावी यासाठी त्यांनी अकलेचे तारे तोडले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे, शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य


