बदलापुरात शिंदेंच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, रात्री दर्शनासाठी गेले असता गाठून मारहाण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
रात्री उशिरा गणपती दर्शनासाठी गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
बदलापूर: मागील काही दिवसांपासून नवी मुंबईच्या बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपात धुसफूस सुरू आहे. बदलापूर नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्यापासून दोन्ही पक्षात तणाव आणि वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. बदलापूरच्या सोनिवली परिसरात शिंदेसेनेचे स्वीकृत नगरसेवक हेमत चतुरे यांना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. याबाबतचा खळबळजनक आरोप शिंदेसेनेनं केला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या सोनिवली परिसरात रात्री १० वाजेच्या सुमारास एका सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेनिमित्त नगरसेवक हेमंत चतुरे दर्शनासाठी गेले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी बंटी म्हसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चतुरे यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी चतुरे यांना गंभीर मारहाण केल्याचा आरोप शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
advertisement
रुग्णालयात पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी
या हल्ल्यात हेमंत चतुरे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी भाजपविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
खरं तर, बदलापूरमध्ये शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील शीतयुद्ध गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या ताज्या घटनेमुळे या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असताना स्थानिक पातळीवर अशाप्रकारे वाद होत असल्याने पक्षनेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 7:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बदलापुरात शिंदेंच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, रात्री दर्शनासाठी गेले असता गाठून मारहाण










