लेक गरोदर होती, पण सासरचे पैशांसाठी हपापलेले ! ८० लाखांच्या विम्याने घेतला गरोदर पल्लवीचा बळी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पल्लवीच्या नशिबी पुन्हा तोच संघर्ष! ८० लाखांचा विम्यात डोळा ठेवून सासरच्यांनी मांडला छळ; सासरच्या लोभापायी एका माऊलीने पोटच्या गोळ्यासह संपवलं आयुष्य
ज्या हातांनी आधार द्यायला हवा होता, त्याच हातांनी छळ मांडला आणि एका गरोदर विवाहितेवर मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली. हुंडा आणि पहिल्या पतीच्या विम्यातून मिळालेल्या लाखो रुपयांच्या हव्यासापोटी सासरच्या मंडळींनी केलेल्या अमानुष मानसिक आणि शारीरिक छळामुळे पल्लवी गोपाल सहाने या विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली. पोटात वाढणाऱ्या जिवासह पल्लवीने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विम्याच्या पैशांनी घेतला बळी
पल्लवीचा हा दुसरा विवाह १२ जुलै २०२४ रोजी गोपाल सहाने याच्याशी झाला होता. लग्नात माहेरच्यांनी ऐपतीप्रमाणे ३ लाख रोख आणि सोन्याची अंगठी दिली होती. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. पल्लवीच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर विम्याचे तब्बल ८० लाख रुपये तिला मिळाले होते. ही बाब सासरच्यांना समजताच पल्लवीसाठी तिचं घरच नरक बनलं. पती गोपालने पल्लवीच्या खात्यातून बळजबरीने ३० ते ३५ लाख रुपये काढून घेतले, अशी तक्रार पल्लवीच्या आईने दिली आहे.
advertisement
नातेवाईकांचा पैशांचा हव्यास संपेना
पहिल्या पतीच्या अपघाती मृत्यूचे पल्लवीला 80 लाख रुपये मिळाले होते. त्याची माहिती दुसऱ्या नवऱ्याला समजताच त्याच्या मनातील लोभ जागा झाला. त्याने पल्लवीला छळायला सुरुवात केली. पल्लवीकडून पैसे उकळण्यासाठी तो छळत राहिला. केवळ पतीच नाही, तर सासरच्या इतर नातेवाईकांनीही पल्लवीला अक्षरशः लुटलं. नणंद सीमाच्या लग्नासाठी १० लाख रुपये देण्यास तिला भाग पाडले गेले.
advertisement
एवढ्यावरच हा लोभ थांबला नाही, तर दुसरी नणंद अर्चना जाधव आणि नणंदोई किशोर जाधव यांनी स्वतःच्या घरासाठी २० लाखांची मागणी लावून धरली आणि पल्लवीचा छळ केला. पैशांच्या या अघोरी मागणीपुढे पल्लवीची सहनशीलता संपली आणि तिने टोकाचे पाऊल उचलले.
पाच जणांवर गुन्हा दाखल
पल्लवीच्या आईने, गोदावरी घोपटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पती गोपाल सहाने, नणंद कविता चिकटे, अर्चना जाधव, नणंदोई किशोर जाधव आणि दीर समाधान चिकटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गरोदर स्त्रीचा अशा प्रकारे पैशांसाठी बळी दिला गेल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 1:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेक गरोदर होती, पण सासरचे पैशांसाठी हपापलेले ! ८० लाखांच्या विम्याने घेतला गरोदर पल्लवीचा बळी









