एकदा वेळ दिली नाही, दुसऱ्यांदा नाशिकला बोलावलं पण... कॅप्टनच्या शेजाऱ्याचा डोळ्यात अंजन घालणारा अनुभव
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ashok Kharat Village Mirgaon Ground Report: मिरगावातील अशोक खरात याच्या शेजाऱ्यांनी त्याचा वावर, त्याची काम करण्याची पद्धती याबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
नाशिक : कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाने मिरगावात महादेवाचे मंदिर बांधून दर्शनाला श्रीमंत भक्तांना बोलावून त्यांच्या शंकांचं निरसन करून देतो, असे भासवून त्यांच्याकडून लाखो रुपये उळकले. तसेच शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केवळ श्रीमंत भक्तांनाच तो वेळ देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. मिरगावातील अशोक खरात याच्या शेजाऱ्यांनी त्याचा वावर, त्याची काम करण्याची पद्धती याबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
अशोक खरात याच्याकडे शनिवारी आणि रविवारी भयंकर गर्दी असायची. लोक लांबून लांबून त्याच्याकडे सल्ला घ्यायचे यायचे. त्याचा सल्ला प्रमाण मानून आपण काम केले की मानासारखे होतेच, अशी सर्वदूर त्याची ख्याती पसरली होती. आम्ही हीच ख्याती ऐकून आमची समस्या घेऊन गेलो होतो, परंतु आम्हा गरीबांना त्यांनी वेळच दिला नाही. तो केवळ श्रीमंतांनाच वेळ द्यायचा, असा अनुभव मीरगावातील रामकृष्ण मदने यांनी सांगितला. 'मुंबई तक'शी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. तसेच त्यांना आलेला अनुभवही त्यांनी कथन केला.
advertisement
गरिबांशी तो बोलत नव्हता, कॅप्टनच्या शेजाऱ्याचा डोळ्यात अंजन घालणारा अनुभव
रामकृष्ण मदने म्हणाले, गेल्या १० ते १२ वर्षांपासून आम्ही अशोक खरात याला ओळखतो. त्याच्याशी आमची ओळख होती. एक दोन वेळा कौटुंबिक समस्या घेऊन आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. परंतु त्याच्या कार्यालयात भयंकर वेटिंग असल्याने आम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागले. अशोक खरात याने कधीही स्थानिक लोकांना, स्थानिक लोकांच्या समस्यांना प्राधान्य दिले नाही. त्याच्याकडे येणारे लोक बड्या हस्ती होत्या. उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोकांचा राबता त्याच्याकडे असायचा. त्यामुळे गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोक त्याच्याकडे येत नव्हते.
advertisement
आमच्याकडे त्याला द्यायला कुठून पैसे येणार...?
शनिवारी रविवारी अशोक खरात याच्या कार्यालयात तसेच मंदिरात अनेक लोक यायचे. त्या लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन अशोक खरात त्यांना काहीबाही सांगत असे. पण स्थानिक लोकांना भेटण्याकरिता त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याच्यामागे कोणते कारण होते, हे मात्र आम्हाला माहिती नाही. कौटुंबिक समस्या घेऊन आम्ही दुसऱ्या वेळी गेलो होतो. परंतु त्याने आम्हाला नाशिकला यायला सांगितले. त्याचवेळी तो लोकांकडून खूप पैसे घेतो, असे आम्ही ऐकले होते. आम्ही गरीब माणसे आहोत. आमच्याकडे त्याला द्यायला कुठून पैसे येणार, त्यामुळे आम्ही जायचे टाळले. परत त्याच्याकडे जावे, असे आम्हाला वाटले नाही, असेही रामकृष्ण मदने यांनी सांगितले.
advertisement
आम्ही वास्तुशांतीला गेलो होतो, त्यावेळी...
आम्ही वास्तुशांतीला गेलो होतो, त्यावेळी आम्ही साहेबांना लांबूनच नमस्कार केला. त्यांनीही केवळ नजरेनेच आम्हाला ओळख दिली. व्यायामाकरिता सकाळी बाहेर पडल्यावर ते आम्हाला दिसायचे, त्यावेळीही गप्पा मारण्याचा वगैरे कधीही योग आला नाही, असेही शेजाऱ्याने सांगितले.
एका कुटुंबात मुल होत नव्हते, खरातच्या मार्गदर्शनाने त्यांच्या घरात पाळणा हलला, अशी चर्चा गावात अनेकदा झाली. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. पण एका झटक्यात त्याने गावाचे नाव खराब केले. खरातने आमच्या गावात मंदिर बांधले म्हणून आम्ही त्याच्याकडे वेगळ्या नजरेने आदराने बघत होतोय. परंतु त्यांनी त्यांची त्यांची मर्यादा ओलांडल्याचे राजकीय नेत्यांना पण माहिती नव्हते. मंदिर बांधून त्याचे नाव राज्यात गेले परंतु त्याच्या अशा वागण्याने आमच्या गावाचे नाव खराब झाले, असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 6:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकदा वेळ दिली नाही, दुसऱ्यांदा नाशिकला बोलावलं पण... कॅप्टनच्या शेजाऱ्याचा डोळ्यात अंजन घालणारा अनुभव









