Solapur Flood: पीकच काय मातीही वाहून गेली! 14 लाखांचं कृषी कर्ज आता फेडायचं कसं? बळीराजाला पडला प्रश्न
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Flood: तात्यासाहेब गायकवाड यांनी 14 लाख रुपयांचं कृषी कर्ज काढून कांदा, भोपळा आणि द्राक्षांची लागवड केली होती.
सोलापूर: मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. ऐन सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेली पीकं पाण्याखाली गेली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावात राहणारे शेतकरी तात्यासाहेब गायकवाड यांना कांदा, भोपळा आणि द्राक्षाची लागवड करण्यासाठी जवळपास 13 लाख रुपये खर्च आला होता. पण, नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे. शेतीसाठी काढलेलं कर्ज कसं फेडायचं? हा प्रश्न आता गायकवाड यांना पडला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावात राहणारे शेतकरी तात्यासाहेब मधुकर गायकवाड यांना 14 एकर शेती आहे. त्यांनी 4 एकर कांदा, 4 एकर भोपळा आणि 6 एकर क्षेत्रात द्राक्ष बागेची लागवड केली होती. सोलापूर जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततचा पाऊस आणि नदीला आलेला पूर यामुळे त्यांच्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे.
advertisement
4 एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड करण्यासाठी त्यांना सुमारे दीड लाख रुपये खर्च आला होता. एकरी सव्वा लाख रुपये उत्पन्न कांदा पिकातून मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. पण, आता चार एकर कांदा हा पाण्यात वाहून गेला आहे. पाण्यासोबत शेतातील माती देखील वाहून गेली आहे. भोपळ्याच्या लागवडीसाठी एकरी 15 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. त्यातून एकरी 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित होतं. अतिवृष्टीमुळे भोपळ्याच्या पिकात पाणी साठलं आहे.
advertisement
गायकवाड यांनी 14 लाख रुपयांचं कृषी कर्ज काढून 6 एकर क्षेत्रात द्राक्ष बागेची लागवड केली होती. पण, अतिवृष्टीमुळे यावर्षीचा द्राक्ष बागेचा हंगाम संपूर्ण वाया गेला आहे. 6 एकरात द्राक्ष बाग लागवडीसाठी 9 लाखांचा खर्च आला होता. अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे अतोनात नुकसान झाल्याने एकही पिक हाती येणार नाही. आता बँकेचे हप्ते कसे भरायचे? हा प्रश्न गायकवाड यांना पडला आहे. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करून शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 29, 2025 3:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Flood: पीकच काय मातीही वाहून गेली! 14 लाखांचं कृषी कर्ज आता फेडायचं कसं? बळीराजाला पडला प्रश्न