Independence Day 2025: भारतीय स्वातंत्र्याच्या 17 वर्षे आधीच स्वतंत्र झालं होतं महाराष्ट्रातील हे शहर, तुम्हाला माहितीये का हा इतिहास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Independence Day 2025: भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 1930 मध्येच महाराष्ट्रातील एका शहर 4 दिवस स्वतंत्र होतं. येथील नगरपालिकेवर तिरंगा फडकत होता.
सोलापूर - इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात कापड उद्योगाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये देखील हुतात्म्यांनी लढा उभा केला होता. सोलापूरकरांनी स्वातंत्र्याच्या पूर्वीच म्हणजे 17 वर्षे आधीच 1930 रोजी चार दिवस स्वातंत्र्य अनुभवला आहे. याच ऐतिहासिक संघर्षाबाबत सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
सोलापूर स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीयदृष्ट्या जागृत शहर म्हणून ओळखलं जात होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1930 साली देशवासीयांना सविनय कायदेभंगाची हाक दिली. या हाकेला सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला. सोलापूर शहर 9, 10, 11 आणि 12 मे असं चार दिवस इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र होतं. सोलापूरच्या नगरपरिषदेवर चार दिवस तिरंगा ध्वज फडकत होता.
advertisement
सोलापूरमधील हा लढा दडपून काढण्यासाठी ब्रिटिशांनी शहरात मार्शल लॉची घोषणा केली आणि या चळवळीतील तरुण क्रांतिकारी कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले. ब्रिटिश सरकारने या चौघांवर मंगळवार पेठेतील पोलीस चौकी जळीत प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप लावला. 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी पुणे येथील येरवडा कारागृहात या चार क्रांतिवीरांना फासावर लटकवले.
advertisement
900 वर्षांत पहिल्यांदाच झाली नाही यात्रा
सोलापूर शहरांमध्ये जानेवारी महिन्यात श्री ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांची गड्डा यात्रा असते. या यात्रेच्या वेळेस वेगवेगळ्या भागातील भाविक शहरात येत असतात. या सर्वांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून ब्रिटिशांनी 12 जानेवारी रोजी या चार क्रांतिवीरांना फाशी दिली. या फाशीनंतर 900 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गड्डा यात्रा झाली नव्हती. संपूर्ण सोलापूरमध्ये शोकाकुल वातावरण होते, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांनी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 15, 2025 9:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Independence Day 2025: भारतीय स्वातंत्र्याच्या 17 वर्षे आधीच स्वतंत्र झालं होतं महाराष्ट्रातील हे शहर, तुम्हाला माहितीये का हा इतिहास?