महाराष्ट्रावर दुहेरी संकट! दक्षिणेकडून येतंय वादळ, विकेण्डला कसं राहणार हवामान, घराबाहेर जाण्याआधी IMD चा अलर्ट पाहा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बंगालच्या उपसागरातील Deep Depression आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमान घट, धुकं, थंडी वाढणार आहे. विदर्भात कोल्ड वेवचा इशारा देण्यात आला.
उत्तर भारतात थंडीचा कडाका आणि दाट धुकं वाढलं आहे. आता महाराष्ट्राच्या हवामानातही महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशन आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे राज्यातील तापमानाचा पारा आगामी काही दिवसांत लक्षणीयरीत्या खाली घसरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर काय होईल परिणाम?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील २४ तासांपर्यंत तापमानात फारसा बदल जाणवणार नाही. मात्र, त्यानंतर हळूहळू थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही रात्रीचा गारवा वाढणार असून, पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांत धुक्याचे सावट पाहायला मिळू शकते.
advertisement
बंगालच्या उपसागरात 'सिस्टम' सक्रिय
हवामान खात्याने स्पष्ट केले की, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले Deep Depression सध्या उत्तर-पश्चिम दिशेला सरकत आहे. हे १० जानेवारीच्या सुमारास श्रीलंका किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.
याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. महाराष्ट्रातही विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील.
advertisement
कोल्डवेवचं पुन्हा संकट
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये, विशेषतः राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रचंड मोठी कोल्ड वेव आली आहे. याचा परिणाम म्हणून सातपुडा पर्वत रांगांच्या परिसरातून येणारे थंड वारे खान्देश आणि विदर्भातील हुडहुडी वाढवणार आहेत. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील थंडीचा कडाका १४ जानेवारीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील या वादळी प्रणालीमुळे समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे आणि विमान सेवा दाट धुक्यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 7:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! दक्षिणेकडून येतंय वादळ, विकेण्डला कसं राहणार हवामान, घराबाहेर जाण्याआधी IMD चा अलर्ट पाहा









