रेशन वाटपात शासनाकडून पुन्हा एकदा बदल! नव्याने कुणाला किती धान्य मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration Card : नववर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वितरण पद्धतीत महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत.
मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वितरण पद्धतीत महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. या बदलांनुसार गव्हाच्या वाटपात वाढ करण्यात आली असून तांदळाचा कोटा कमी करण्यात आला आहे. तसेच बराच काळ बंद असलेले अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साखर वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे या वर्गातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून धान्य वितरण अधिक सुसंगत आणि गरजेनुसार करण्यासाठी हे बदल सुचविण्यात आले होते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेताना ग्राहकांना काही नव्या फेरबदलांचा अनुभव येणार आहे.
advertisement
गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांकडून गहू आणि तांदळाचा कोटा वाढविण्याची मागणी होत होती. विशेषतः तांदळाच्या तुलनेत गव्हाचा वापर वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर शासनाने गव्हाच्या वाटपात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचवेळी तांदळाच्या कोट्यात कपात करण्यात आल्याने काही ग्राहकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
advertisement
नव्याने किती धान्य मिळणार?
अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या धान्य वितरणातही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी अंत्योदय कार्डधारकांना दरमहा 15 किलो तांदूळ आणि 20 किलो गहू दिला जात होता. नव्या नियमानुसार या वितरणात बदल होऊन गव्हाचे प्रमाण वाढविले जाणार असून तांदळाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. मात्र शासनाकडून अंत्योदय ग्राहकांसाठी साखरेचे वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या घटनेची काही अंशी भरपाई होणार आहे. बराच काळ साखर वितरण बंद असल्याने या वर्गातील कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
advertisement
दुसरीकडे, प्राधान्य गटातील (PHH) शिधापत्रिकाधारकांच्या धान्य वितरणातही बदल लागू करण्यात आले आहेत. पूर्वी या कार्डधारकांना दरमहा दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जात होता. आता नव्या नियमानुसार तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. म्हणजेच तांदळाच्या कोट्यात एक किलोने कपात करण्यात आली असून गव्हाचा कोटा एक किलोने वाढविण्यात आला आहे.
advertisement
पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आहारातील बदल, गव्हाचा वाढता वापर आणि उपलब्ध साठा यांचा विचार करून हे बदल करण्यात आले आहेत. तसेच धान्य वितरणात समतोल राखण्यासाठी आणि साठ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हे निर्णय आवश्यक असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या बदलांमुळे काही ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असले तरी तांदळावर अधिक अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये नाराजी दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात तांदूळ हा मुख्य अन्नघटक असल्याने तांदळाचा कोटा कमी झाल्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 12:26 PM IST







