लाल दिव्याच्या गाडीला दीड तास! रस्ते पाहून मंत्र्यांनी कपाळाला लावला हात; जळगावात सरकारला घरचा आहेर
- Reported by:EMTIYAZ AHAMAD
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सामान्य आदिवासी बांधवांना किती हाल सोसावे लागत असतील? अशा शब्दांत मंत्र्यांनी आपली शोकांतिका व्यक्त केली.
जळगाव: राज्यातील रस्ते विकासाचे दावे केले जात असतानाच, खुद्द राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला खराब रस्त्यांचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेवरून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शासनाने दिलेली लाल दिव्याची गाडी असूनही मला या भागात येताना दीड तास लागत असेल, तर येथील सामान्य आदिवासी बांधवांना किती हाल सोसावे लागत असतील? अशा शब्दांत मंत्र्यांनी आपली शोकांतिका व्यक्त केली.
चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमासाठी मंत्री अशोक उईके उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. व्यासपीठावर भाजपच्या खासदार स्मिता वाघ, तहसीलदार आणि प्रांताधिकारी उपस्थित असतानाच मंत्री उईके यांनी आपल्या भाषणातून प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले.
मंत्र्यांचे परखड बोल
advertisement
आज मी या आदिवासी पाड्यावर येताना जे अनुभवले ते अत्यंत वेदनादायी आहे. रस्ते एवढे खराब आहेत की माझ्यासारख्या मंत्र्याला पोहोचण्यासाठी दीड तासाचा वेळ लागतोय. जर मंत्र्यांच्या गाडीची ही अवस्था असेल, तर इथल्या आदिवासी बांधवांनी, रुग्णांनी आणि विद्यार्थ्यांनी कसं प्रवास करायचा? हा मोठा प्रश्न आहे, असे मंत्री उईके म्हणाले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खासदार स्मिता वाघ यांच्यासमोरच त्यांनी ही खंत बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
पुढच्या होळीपर्यंतचा 'अल्टिमेटम'
रस्त्याच्या कामात होत असलेला विलंब पाहून मंत्र्यांनी केवळ खंत व्यक्त करून न थांबता थेट मागणी केली आहे. तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी साहेब आणि खासदार मॅडम, तुम्ही यात तातडीने लक्ष घाला. हा रस्ता तातडीने मंजूर करून त्याचे काम सुरू करा. पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा होळीसाठी या भागात येईल, तेव्हा मला याच ठिकाणी पोहोचण्यासाठी दीड तासाऐवजी फक्त पाऊण तास लागला पाहिजे, एवढा चांगला रस्ता तयार करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
advertisement
रस्त्यांच्या दुरवस्थेवर जाहीर नाराजी
आदिवासी विकास मंत्र्यांनी स्वतःच्याच सरकारच्या कार्यकाळातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. आता मंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हे ही वाचा :
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 7:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाल दिव्याच्या गाडीला दीड तास! रस्ते पाहून मंत्र्यांनी कपाळाला लावला हात; जळगावात सरकारला घरचा आहेर







