3 लाखांची लाच भोवली! कुरार पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने आवश्यक पंचनामे करून रोख रक्कम जप्त केली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत कुरार पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एका अन्य पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असून गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्याने तीन लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी दोन लाख रुपये यापूर्वीच तक्रारदाराकडून स्वीकारण्यात आले होते. मात्र उर्वरित एक लाख रुपयांची रक्कम देण्यास तक्रारदाराने नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
advertisement
रोख रक्कम केली जप्त
तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, आज दुपारी तक्रारदाराकडून उर्वरित एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने आवश्यक पंचनामे करून रोख रक्कम जप्त केली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई
advertisement
या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसीबीकडून देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबईसारख्या महानगरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 9:18 PM IST






