Raj Thackeray : ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच बिघडणार? उदय सामंत यांच्या भेटीमागचं 'राज' काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackray Raj Thackeray : शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे आता शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दोन्ही नेत्यांची एकत्रित मोर्चेबांधणी झाल्यास मुंबई महापालिकेतील भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीला धक्का बसू शकतो, अशी भीती महायुतीतील काही घटकांना वाटत आहे. त्यामुळेच, शिंदेसेनेकडून राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यापासून "राजकीयदृष्ट्या" दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीकडे केवळ सौजन्यभेट म्हणून न पाहता, राजकीय डावपेचाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः, जर राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर महापालिकेतील मराठी मतांचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते, असा अंदाज आहे.
advertisement
मनसे आणि उद्धव यांचं एकत्र येणं म्हणजे महायुतीसाठी मोठा धोका ठरू शकतो, याची जाणीव शिंदे गटाला आहे. त्यामुळे, राज ठाकरे हे महायुतीसोबत येतीलच असे नाही, तरी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊ नये, यासाठी सतत संवाद आणि संपर्क ठेवल्याचे बोलले जात आहे.
आगामी महिन्यांत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकारणातील हे नवे हलचाली पाहता, मुंबईत शिवसेना-मनसे युती होणार की महायुतीची धुरा मजबूत राहणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 14, 2025 10:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच बिघडणार? उदय सामंत यांच्या भेटीमागचं 'राज' काय?