Tejasvee Ghosalkar: एक पक्ष प्रवेश, भाजपनं बीएमसीचं गेम कसा फिरवला? तेजस्वी घोसाळकरांनी का वाढवली ठाकरेंची डोकेदुखी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Tejasvee Ghosalkar: ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने महापालिका निवडणुकीच्या समीकरणात मोठा उलटफेर झाला आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाला उत्तर मुंबईत दोन दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने महापालिका निवडणुकीच्या समीकरणात मोठा उलटफेर झाला आहे. तेजस्वी घोसाळकरांच्या प्रवेशामुळे भाजपने उत्तर मुंबईतील आपला बालेकिल्ला आता शिंदे गटाच्या साथीने आणखीच मजबूत केल्याचे चित्र आहे.
पश्चिम उपनगरमधील उत्तर मुंबईत भाजपचे चांगलेच वर्चस्व आहे. शिवसेनेची ताकद या ठिकाणी होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंना या भागात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील फूट, भाजप-महायुतीने ठाकरे गटाला चांगलेच धक्के दिले आहेत. दहिसर–मागाठाणे परिसरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या घटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत दहिसर आणि मागाठाणे या दोन विधानसभा मतदारसंघांत तत्कालीन एकसंध शिवसेनेने दमदार कामगिरी केली. या ठिकाणी शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. या यशामुळे पश्चिम उपनगरात शिवसेनेची पकड मजबूत मानली जात होती. विशेषतः वरळी, शिवडीसोबतच दहिसर–मागाठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मराठी बहुल भागावर शिवसेनेची पकड आणखीच घट्ट झाल्याचे म्हटले जात होते.
advertisement
मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर या चित्राला मोठा तडा गेला. शिंदेंच्या बंडात आमदार मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी साथ दिली. दहिसर आणि मागाठाणेतील बहुतांश नगरसेवकांनी एकामागोमाग एक उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे या भागातील ठाकरे गटाची ताकद सातत्याने कमी होत गेल्याचे निरीक्षण विश्लेषक नोंदवतात.
advertisement
आता तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर दहिसर आणि मागाठाणे मतदारसंघात ठाकरे गटाकडे अवघे दोन माजी नगरसेवक उरले असल्याचे चित्र आहे. विभाग क्रमांक १ मध्ये २०१७ मध्ये दिसलेली शिवसेनेची संघटनात्मक ताकद आता पूर्णपणे ढासळल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल उद्धव ठाकरे यांच्यासाठी चिंतेचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
advertisement
२०१७ च्या निवडणुकीतील १० पैकी दोनच नगरसेवक ठाकरेंकडे
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, रिद्धी खुरसुंगे, संध्या दोशी, संजय घाडी, गीता सिंघण, तेजस्वी घोसाळकर, माधुरी भोईर, सुजाता पाटेकर असे दहा नगरसेवक निवडून आले होते. यातील आठ जणांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. तर, माधुरी भोईर आणि सुजाता पाटेकर या दोनच माजी नगरसेविका ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत.
advertisement
दहिसर-मागाठाणे राखणं ठाकरेंसाठी आव्हानात्मक....
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासाठी दहिसर आणि मागाठाणे राखणं आव्हानात्मक असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद काही प्रमाणात कमी झाली असली तरी या ठिकाणी मनसे एकत्र येणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा करिष्मा या विभागात दिसल्यास महापालिकेच्या सत्तेचं समीकरण ठाकरेंच्या जवळ येईल असेही म्हटले जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 11:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tejasvee Ghosalkar: एक पक्ष प्रवेश, भाजपनं बीएमसीचं गेम कसा फिरवला? तेजस्वी घोसाळकरांनी का वाढवली ठाकरेंची डोकेदुखी










