Lonar Lake: बुलढाण्यातील जिओ हेरिटेज साइट धोक्यात! जबाबदार कोण, माणूस की निसर्ग?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Lonar Lake: उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं, हे जगातील एकमेव सरोवर आहे.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. 'युनेस्को'नं या सरोवराला 'जिओ हेरिटेज साइट' म्हणून मान्यता दिलेली आहे. मात्र, हे ठिकाण सध्या संकटात असल्याची चिन्हं दिसत आहेत. सरोवरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून सरोवर परिसरातील अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. शिवाय, वाढलेल्या पाणी पातळीमुळे जैवविविधता देखील धोक्यात आली आहे. अभयारण्यातील वन्यप्राणी बाहेर पडत असून मानव आणि वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.
अभ्यासकांच्या मते. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे सुमारे 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले हे जगातील एकमेव सरोवर आहे. सरोवरातील पाणी अल्कधर्मीय असून पाण्यात सोडियम क्लोराईड आणि सल्फेटसारख्या क्षारांचे प्रमाण अधिक आहे. दुर्मिळ सूक्ष्म जिवाणूंसाठी हे पाणी अतिशय पोषक आहे. मात्र, आता या पाण्याची 'पीएच' पातळीदेखील कमी झाल्यामुळे पाण्याचे गुणधर्म बदलत आहेत.
advertisement
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे परिसरातील कमळजा माता मंदिर, गणेश मंदिर, रामगया मंदिर अशी अनेक ऐतिहासिक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. सरोवराच्या काठावर पाण्याचे पाच जिवंत झरे आहेत. हे पाणी आधी शेतीसाठी दिलं जात होतं. त्यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी स्थिर होती. काळाच्या ओघात येथील शेतीक्षेत्र नाहीसं झालं असून विहिरीदेखील बुजल्या आहेत.
advertisement
परिसरात असलेल्या झऱ्यांचं पाणी थेट सरोवरात जात आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तर झऱ्यांचं पाणी देखील वाढलं आहे. परिणामी सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदाच माशांचं अस्तित्व आढळलं आहे.
अभ्यासकांच्या मते, लोणारची ही अवस्था मानवी हस्तक्षेपामुळे झाली आहे. लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात जात आहे. शिवाय, पर्यटकांनासाठी सरोवराच्या काठावर रस्ता बांधला जात आहे. या कामातील माती आणि मुरुम थेट सरोवराच्या तळाशी जात आहे. त्यामुळे देखील सरोवराची खोली कमी झाली आहे.
Location :
Buldana (Buldhana),Buldana,Maharashtra
First Published :
September 25, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lonar Lake: बुलढाण्यातील जिओ हेरिटेज साइट धोक्यात! जबाबदार कोण, माणूस की निसर्ग?