शेतकऱ्याने घेतले एकरी 120 टन ऊस उत्पादन, प्रति एकर मिळवले 3 लाखांचे उत्पन्न, पाहा कशी केली शेती? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
कोल्हापुरातील एका कृषी पदविकाधारकाने आपल्या शेतात विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. त्याने त्याच्या शेतात एकरी 120 टन ऊस पिकवून प्रति एकर तीन लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर हा एक महत्त्वाचा ऊस उत्पादक जिल्हा आहे. कोल्हापुरातील बहुतांश शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे ऊस असते. अशातच कोल्हापुरातील एका कृषी पदविकाधारकाने आपल्या शेतात विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. त्याने त्याच्या शेतात एकरी 120 टन ऊस पिकवून प्रति एकर तीन लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
कोल्हापुरातील कागल तालुक्यात म्हाकवे या गावात राहणाऱ्या सतीश ऊर्फ सिद्राम शिवाजी पाटील यांनी त्यांचे कृषी पदविकेचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळेच त्यांच्या आठ एकर शेतात योग्य व्यवस्थापनाने शेती करुन चांगला नफा ते मिळवत आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या शेतातील एक एकरात विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. योग्य नियोजन आणि कठीण परिश्रम करून त्यांनी त्यांच्या शेतजमिनीत एकरी 120 टन ऊस उत्पादित केला आहे. त्यामुळे परिवारा आणि ग्रामस्थांसह कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
advertisement
कशी केली मशागत?
सतीश यांनी त्यांच्या आठ एकर शेतीपैकी एक एकर जमिनीमध्ये 2022 साली उन्हाळ्यात उभी आडवी नांगरट करून पाच ट्रॉली शेणखत, 15 टन कंपोस्ट खत टाकून 15 मे रोजी पाच फुटी सरी मारली होती. 2 जून 2022 रोजी त्यांनी एक डोळा पद्धतीने को 86032 फाउंडेशन जातीच्या उसाची दीड फूट अंतरावर लावण केली असल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली आहे.
advertisement
कोणत्या रासायनिक खतांचा केला वापर
शेतात ऊस लावणी झाल्यानंतर सतीश यांनी एकूण सहा रासायनिक खताचे डोस माती मिसळून दिले होते. त्यांनी चार आळवण्या, सहा फवारण्या देखील दिल्या होत्या. रासायनिक खते, जिवाणू खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके अशा पिकाला लागणाऱ्या सर्व निविष्ठांचा वापर केल्याचे सतीश यांनी सांगितले.
advertisement
किती मिळाले उत्पादन?
10 जानेवारी 2024 रोजी त्यांनी ऊसतोड पूर्ण केली. एकूण ऊस उत्पादन पाहता एकरी 120 टन ऊस शेतात पिकला. पूर्ण वाढ झालेला ऊस सरासरी 50 ते 55 कांडीपर्यंत मिळाला असून त्याचे साडेचार ते पाच किलो वजन मिळाले. तसेच वॉटरशूट (कोंब) देखील 30 कांडीपर्यंत मिळाले असून त्याचेही वजन चार ते साडेचार किलो मिळाल्याचे सतीश यांनी सांगितले.
advertisement
एकरी 3 लाखांचे उत्पन्न
नांगरट, मशागत, खते आणि इतर गोष्टींसाठी एक एकरमध्ये सतीश यांना उस उत्पादनासाठी एक लाख पंधरा हजार रुपये खर्च आला. तर सरासरी 3407 रुपये प्रतिटन उसाला दर मिळाल्याने खर्च वजा केला असता, सरासरी तीन लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळी भागात केली रंगीत ढोबळी मिरचीची लागवड; 2 एकरात शेतकरी कसा झाला मालामाल? Video
view commentsदरम्यान कृषी क्षेत्रातील योग्य शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतात यशस्वी शेती करण्याकडे सतीश पाटील यांनी लक्ष दिले आहे. त्यामुळेच आजूबाजूच्या भागातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत असतात. त्यातच विक्रमी ऊस उत्पादन घेतल्यामुळे सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 29, 2024 5:20 PM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
शेतकऱ्याने घेतले एकरी 120 टन ऊस उत्पादन, प्रति एकर मिळवले 3 लाखांचे उत्पन्न, पाहा कशी केली शेती? Video

