चीनची महाभयंकर चाल, जगाला युद्धात गुंतवून लावली 'गुपचूप' फिल्डिंग; सर्वात मोठा गेमप्लॅन उघड
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Reserves: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन शांतपणे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत असून त्यामागे दीर्घकालीन आर्थिक रणनीती असल्याचे संकेत मिळत आहेत. सलग 16व्या महिन्यात गोल्ड रिझर्व्ह वाढवत चीनने भविष्यातील आर्थिक शक्तीची पायाभरणी सुरू केली आहे.
बीजिंग: जगभरात एकीकडे गॅस फील्ड्सवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्या आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे अस्थिरता निर्माण झाली असताना, चीन मात्र शांतपणे आणि दीर्घकालीन रणनीतीनुसार वेगळीच चाल खेळताना दिसत आहे. चीन सातत्याने सोने खरेदी करत असून सलग 16व्या महिन्यात त्याच्या केंद्रीय बँकेने गोल्ड रिझर्व्ह वाढवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात 30,000 औंस सोने खरेदी केल्यानंतर चीनचा एकूण अधिकृत सोन्याचा साठा 2,309 टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. ही केवळ खरेदी नसून अमेरिकी डॉलरविरुद्ध आखलेली एक मोठी रणनीती असल्याचे मानले जात आहे. ब्लूमबर्गसह अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
18 मार्च 2026 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये पीपल्स बँक ऑफ चायना (PBOC) ने सुमारे 30,000 औंस सोने खरेदी केले. यामुळे चीनचा अधिकृत गोल्ड रिझर्व्ह 2,309 टनांपर्यंत पोहोचला असून त्याची किंमत अंदाजे 387.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे. विशेष म्हणजे चीनच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा आता सुमारे 10% झाला आहे; जो मागील 20 महिन्यांत जवळपास दुप्पट झाला आहे.
advertisement
मात्र हे एवढ्यावर मर्यादीत नाही. अनेक जागतिक विश्लेषकांच्या मते चीनचा प्रत्यक्ष सोन्याचा साठा अधिकृत आकडेवारीपेक्षा खूपच मोठा असू शकतो. शांघाय गोल्ड एक्सचेंज, हाँगकाँगमार्गे होणारी आयात, रशियासोबतचे थेट व्यवहार आणि सरकारी कंपन्यांमार्फत होणारी खरेदी या सर्वांचा विचार केल्यास चीनचा खरा सोन्याचा साठा अधिकृत आकडेवारीपेक्षा 2 ते 10 पट जास्त असू शकतो.
advertisement
चीनने सोने खरेदी करण्यासाठी एक अत्यंत हुशार सिस्टम तयार केली आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंजमध्ये फिजिकल सेटलमेंट अनिवार्य आहे, म्हणजे खरेदी केलेले सोने प्रत्यक्षात वितरित केले जाते. याशिवाय एकदा सोने वॉल्टमधून बाहेर पडले की ते पुन्हा त्या सिस्टीममध्ये परत येत नाही, त्यामुळे ते ट्रॅकिंग सिस्टीमच्या बाहेर जाते.
जानेवारी महिन्यातच शांघाय गोल्ड एक्सचेंजमधून 126 टन सोने बाहेर काढण्यात आले होते. हाँगकाँग हे यासाठी प्रमुख प्रवेशद्वार बनले आहे. तर लंडन, स्वित्झर्लंड आणि दुबईसारख्या बाजारांतूनही ओव्हर-द-काउंटर व्यवहारांद्वारे सोने खरेदी केले जात आहे. ज्याची नोंद कोणत्याही एक्सचेंज डेटामध्ये दिसत नाही.
advertisement
सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत एएनझेड बँकेच्या विश्लेषकांनी सांगितले की चीनची ही हालचाल केवळ गुंतवणूक नसून एक व्यापक रणनीतीचा भाग आहे. चीन असा साठा तयार करत आहे. जो कोणत्याही देशाद्वारे गोठवता येणार नाही आणि जो कोणत्याही समुद्री मार्ग किंवा पाइपलाइनवर अवलंबून नाही.
याच दरम्यान चीन तेल, खत आणि संरक्षण क्षेत्रातही मोठे पाऊल उचलत आहे. तो स्वस्त तेल साठवून ठेवत आहे, खताच्या निर्यातीवर निर्बंध घालत आहे आणि आपली लष्करी ताकद वाढवत आहे. म्हणजेच प्रत्येक आघाडीवर स्वतःला अधिक सुरक्षित आणि सक्षम बनवण्याची तयारी सुरू आहे.
advertisement
या सर्व घडामोडींमधील सर्वात मोठा संकेत अमेरिकन डॉलरबाबत आहे. सध्या डॉलर ही जगाची प्रमुख रिझर्व्ह करन्सी असली तरी चीन भविष्यासाठी एक प्रकारची ‘इन्शुरन्स पॉलिसी’ तयार करत आहे. जर भविष्यात डॉलर कमकुवत झाला किंवा जागतिक आर्थिक व्यवस्था बदलली, तर सोने ही चीनची सर्वात मोठी ताकद ठरू शकते.
दरम्यान बाजारात एक वेगळाच ट्रेंड दिसत आहे. किरकोळ गुंतवणूकदार गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करत असताना मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री केली जात आहे. यामुळे पेपर गोल्ड आणि प्रत्यक्ष (फिजिकल) सोन्यातील फरक वाढत चालला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 10:40 PM IST
मराठी बातम्या/मनी/
चीनची महाभयंकर चाल, जगाला युद्धात गुंतवून लावली 'गुपचूप' फिल्डिंग; सर्वात मोठा गेमप्लॅन उघड










