EPFO असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! UPI वापरून काढता येणार पैसे, कधी लागू होणार नियम पाहा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
EPFO ने UPI द्वारे पीएफ काढण्याची सुविधा सुरू केली आहे. आता सदस्यांना पैसे काही मिनिटांत मिळतील, क्लेम प्रक्रिया सुलभ झाली असून १०० टक्के रक्कम काढता येईल.
खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. EPFO ने कोट्यवधी सदस्यांसाठी नवीन बदल केला आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही. एप्रिल महिन्यापासून पीएफ काढण्याची प्रक्रिया थेट UPI शी जोडली जाणार आहे. यामुळे तुमचे पैसे अवघ्या काही मिनिटांत तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतील.
नेमकी सुविधा काय आहे?
श्रम मंत्रालय एका विशेष प्रोजेक्टवर काम करत असून, या अंतर्गत सदस्यांना त्यांच्या अकाउंटवरील जमा असलेली रक्कम पाहता येईल आणि ही रक्कम थेट UPI पिन टाकून ट्रान्सफर करता येईल. ज्याप्रमाणे आपण गुगल पे किंवा फोन पे वरून पैसे पाठवतो, तितक्याच सहजतेने आता पीएफचे पैसे मिळवता येणार आहेत.
क्लेमच्या कटकटीतून सुटका
सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी क्लेम फॉर्म भरावा लागतो. ऑटो सेटलमेंटमुळे ही प्रक्रिया तीन दिवसांवर आली असली, तरी त्यासाठी अर्ज करणे बंधनकारक असते. मात्र, नवीन UPI प्रणालीमुळे वारंवार क्लेम दाखल करण्याची झंझट कायमची संपू शकते. वर्षाला साधारण ५ कोटींहून अधिक क्लेम हाताळणाऱ्या EPFO वरील कामाचा ताणही यामुळे कमी होणार आहे.
advertisement
१०० टक्के रक्कम काढता येणार
ऑक्टोबर २०२५ मध्ये पीएफच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. आता आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घरासाठी तुम्ही तुमच्या आणि मालकाच्या हिशाची १०० टक्के रक्कम काढू शकता. मात्र, सदस्याच्या सुरक्षित भविष्यासाठी खात्यात किमान २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागेल, जेणेकरून निवृत्तीनंतरचं आर्थिक सुरक्षा कवच कायम राहील आणि त्यावर ८.२५% व्याजाचा लाभही मिळत राहील.
advertisement
बँक खात्यात पैसे आल्यावर तुम्ही ते डिजिटल पेमेंटसाठी किंवा ATM मधून काढण्यासाठी वापरू शकता. ऑटो सेटलमेंटची मर्यादा आधीच १ लाखावरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. कागदपत्रांची कटकट संपल्याने सर्वसामान्यांना आणीबाणीच्या काळात तातडीने आर्थिक मदत मिळेल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 9:03 AM IST
मराठी बातम्या/मनी/
EPFO असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! UPI वापरून काढता येणार पैसे, कधी लागू होणार नियम पाहा









