Gold Silver Price: 33 तासांत 5000 रुपयांनी महाग झालं सोनं, Trade war च्या भीतीनं मोठी उसळी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
देशातील वायदा बाजारात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला, 91,850 रुपये. आंतरराष्ट्रीय टेरिफ तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे ही वाढ झाली आहे.
देशातील वायदा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला. 7 एप्रिलपासून सुरू झालेल्या वाढीच्या ट्रेंडमध्ये फक्त 33 व्यापारी तासांत सोनं तब्बल 4,900 रुपयांनी महागलं आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वरील आकडेवारीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत सोन्याची किंमत 91,850 रुपयांवर पोहोचली, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.
महावीर जयंतीच्या दिवशी बाजार फक्त दुसऱ्या सत्रात संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू झाला. सत्र सुरू होताच सोनं 1,946 रुपयांच्या उसळीसह 91,750 रुपयांवर व्यापार करत होतं, तर काही वेळातच त्याने 91,850 रुपयांचा विक्रमी दर गाठला. हे दर 7 एप्रिलला नोंदवलेल्या 86,928 रुपयांपेक्षा जवळपास 5.5 टक्क्यांनी अधिक आहेत.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम
advertisement
सोन्याच्या किमतीत या झपाट्याच्या वाढीमागे आंतरराष्ट्रीय टेरिफ तणाव कारणीभूत ठरत आहे. अमेरिका आणि चीनमधील टेरिफ युद्धामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेने बहुतेक देशांवरील टेरिफ 90दिवसांसाठी स्थगित केले असले तरी चीनवर टेरिफ वाढवून 125 टक्क्यांपर्यंत नेले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण घेतलं आहे.
मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि गुंतवणूकदारांचा कल
advertisement
जिओ-पॉलिटिकल अस्थिरतेमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनीही सोन्याची खरेदी वाढवली आहे. चीनमध्ये तर गोल्ड ETF मध्ये विक्रमी गुंतवणूक झाल्याचे 'ब्लूमबर्ग'च्या अहवालात नमूद आहे. याशिवाय, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळेही सोन्याला आधार मिळत आहे. गुंतवणूकदारांसाठी सोनं सध्या 'सेफ हेवन' म्हणून उभं राहत असल्याचं चित्र आहे.
advertisement
महागाईची भीती आणि डॉलर कमजोर
अमेरिकेत महागाई वाढण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत. मार्च महिन्यात अमेरिकी CPI (ग्राहक किंमत निर्देशांक) फेब्रुवारीच्या तुलनेत कमी नोंदवला गेला आहे, ज्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम डॉलरच्या मूल्यात घट आणि सोन्याच्या किमतीत वाढ असा झाला आहे.
advertisement
आशियाई देशांतही वाढती मागणी
इंडोनेशियासह काही आशियाई देशांमध्येही आर्थिक अनिश्चिततेमुळे लोक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत. त्यांच्या मते, येणाऱ्या कठीण आर्थिक काळात सोनं एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
पुढील वाटचाल काय?
advertisement
विश्लेषकांच्या मते, जर अमेरिका-चीन यांच्यातील टेरिफ तणाव कायम राहिला, तर पुढील काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 11, 2025 7:05 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: 33 तासांत 5000 रुपयांनी महाग झालं सोनं, Trade war च्या भीतीनं मोठी उसळी