BMC Mayor Election: बीएमसी महापौर निवडणुकीआधीच ठाकरेंना धक्का, शिंदेंच्या एका खेळीनं विरोधकांसह भाजपही चक्रावला! नेमकं काय घडलं
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:susmita Bhadane patil
Last Updated:
BMC Mayor Election: मुंबई महापौर निवडणुकीआधीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवशक्ती आघाडीत फूट पडली आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या राजकारणात आज एक मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महापौर निवडणुकीआधीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवशक्ती आघाडीत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या खेळीने ठाकरे गटाला धक्का बसला असून भाजपही चितपट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबईतील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर रावराणे यांनी हा निर्णय घेतल्याने, निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत मोठा फटका बसला आहे.
दोन्ही 'राष्ट्रवादी' आता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी!
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट कार्यरत होते. अजित पवार गट आधीच सत्तेसोबत होता, मात्र शरद पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आता रावराणे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने, मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गट आता शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता एकूण ४ नगरसेवकांचे अतिरिक्त बळ जमा झाले आहे. भाजपसोबतच्या वाटाघाटी करताना शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढणार आहे.
advertisement
निधी आणि विकासासाठी महायुतीला पाठिंबा...
आपल्या या अनपेक्षित निर्णयाचे स्पष्टीकरण देताना अजित रावराणे म्हणाले की, "प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळवणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे माझे प्राधान्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाबाबत दिलेले आश्वासन आणि प्रभागाच्या निधीसाठी मी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे."
ठाकरेंसाठी मोठा धक्का...
निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणाऱ्या ठाकरेंसाठी हा निर्णय चिंताजनक मानला जात आहे. शरद पवारांचा मुंबईत असलेला हा एकमेव 'मोहरा' आता शिंदेंच्या गोटात गेल्याने महापालिकेतील विरोधी पक्षाची ताकद कमी झाली आहे. महापौर निवडणुकीत ठाकरे गटाकडून काँग्रेसला सोबत घेऊन विरोधकांचे संख्याबळ दाखवण्याचे प्रयत्न होते. मात्र, शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाने महायुतीला पाठिंब्याचा निर्णय जाहीर केल्याने मोठा उलटफेर झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Mayor Election: बीएमसी महापौर निवडणुकीआधीच ठाकरेंना धक्का, शिंदेंच्या एका खेळीनं विरोधकांसह भाजपही चक्रावला! नेमकं काय घडलं







