नोकरी बदलली आणि Form 16 दोन आले तर भरावा लागेल दंड, Income Tax चा नियम काय सांगतो?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दोन वेगवेगळ्या नोकऱ्या असल्यामुळे, दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने टीडीएस कापतात आणि पूर्ण उत्पन्नाचा विचार न झाल्यास तुमच्यावर अतिरिक्त कर भरण्याची जबाबदारी येते. यामुळे एडव्हान्स टॅक्स भरणं बंधनकारक होतं.
मुंबई: आजच्या काळात नोकरी बदलणं सामान्य झालं असलं तरी, त्यासोबत येणाऱ्या कर संबंधित जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात दोन कंपन्यांमध्ये काम केलं असेल, तर तुमच्याकडे दोन फॉर्म-16 असतील. प्रत्येक कंपनीकडून स्वतंत्र फॉर्म-16 मिळतो, ज्यामध्ये तुमचा पगार, कापलेला टीडीएस आणि डिडक्शनची माहिती असते. फॉर्म-16 चे दोन भाग असतात. पार्ट A मध्ये कंपनी व कर्मचाऱ्याचे तपशील आणि टीडीएस जमा केलेली रक्कम दिलेली असते, तर पार्ट B मध्ये पगाराचा संपूर्ण तपशील, मिळालेले डिडक्शन आणि गुंतवणुकीसंबंधीची माहिती दिली जाते.
इथेच एक मोठा धोका आहे. दोन वेगवेगळ्या नोकऱ्या असल्यामुळे, दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने टीडीएस कापतात आणि पूर्ण उत्पन्नाचा विचार न झाल्यास तुमच्यावर अतिरिक्त कर भरण्याची जबाबदारी येते. यामुळे एडव्हान्स टॅक्स भरणं बंधनकारक होतं. जर तुमची एकूण करदेयता 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि वेळेवर एडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर आयकर विभाग दंड आणि व्याज आकारतो. हा एडव्हान्स टॅक्स टप्प्याटप्प्याने भरावा लागतो. 15 जूनपर्यंत 15 टक्के, 15 सप्टेंबरपर्यंत 45 टक्के, 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के आणि 15 मार्चपर्यंत 100 टक्के कर भरलेला असावा.
advertisement
जर तुम्ही वेळेवर टॅक्स न भरला तर, उशीराचा व्याज आणि दंड लागणार हे नक्की. त्यामुळे, दोन किंवा अधिक नोकऱ्या बदलल्यास प्रत्येक फॉर्म-16 नीट गोळा करा, एकत्रित उत्पन्नाचा अंदाज बांधा आणि लागणाऱ्या कराची वेळेत पूर्तता करा. यामुळे आयकर विभागाकडून नोटीस टळेल आणि अनावश्यक व्याज व दंडही वाचवता येईल. विशेष लक्षात ठेवा, वयस्कर व्यक्तींसाठी (60 वर्षांहून अधिक वयाचे आणि व्यवसाय न करणारे) एडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही.
advertisement
एकंदरीत, नोकरी बदलताना केवळ नवीन पगार किंवा संधीच्या मागे न धावता, कर भरताना होणाऱ्या जबाबदाऱ्यांनाही तितकंच गांभीर्यानं घ्या. अन्यथा, फॉर्म-16 हातात असूनही आयकर विभागाच्या नोटीसचा फटका बसू शकतो. त्यामुळे नोकरी बदलताना आणि ITR भरताना विशेष काळजी घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2025 12:49 PM IST
मराठी बातम्या/मनी/
नोकरी बदलली आणि Form 16 दोन आले तर भरावा लागेल दंड, Income Tax चा नियम काय सांगतो?