Indian Economy: 90% लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण होत नाहीत; देश कोण चालवतंय? धक्कादायक Report
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
भारताच्या आर्थिक विकासात मध्यवर्गाची भूमिका महत्त्वाची आहे, परंतु 90% लोकांकडे गरजेपलीकडे खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. त्यामुळे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न धोक्यात आहे.
मुंबई: भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था अन्य कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. यामुळेच भारत विकसित राष्ट्र होण्याची स्वप्न पाहत आहे. देशाला विकसित राष्ट्र करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असलेला घटक म्हणजे मध्यवर्ग होय. मात्र आता एका अहवालामुळे भारताचे विकसित राष्ट्र होण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसू शकतो.
भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र एका नव्या अहवालामुळे या ध्येयासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. ‘ब्लूम व्हेंचर्स इंडस व्हॅली वार्षिक अहवाल 2025’ नुसार भारताच्या 90% लोकसंख्येकडे (सुमारे 100 कोटी लोक) गरजेपलीकडे खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. ते आपल्या मूलभूत गरजा भागवण्यातच गुंतलेले आहेत. याउलट देशातील अवघे 10% लोकच (सुमारे 13-14 कोटी) देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत.
advertisement
गरीब मात्र तसाच!
ब्लूम व्हेंचर्स इंडस व्हॅलीच्या अहवालानुसार भारताचा ग्राहकवर्ग विस्तारत नाही तर तो अधिक ठळक होत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. मात्र श्रीमंतांची संख्या फारशी वाढत नाहीये. त्याचवेळी 30 कोटी लोक 'नवे ग्राहक' म्हणून ओळखले जात असले तरी ते खर्च करण्यास कचरतात.
advertisement
प्रीमियम उत्पादनांची मागणी
भारतातील कंपन्या स्वस्त वस्तूंच्या ऐवजी प्रीमियम उत्पादनांकडे अधिक लक्ष देत आहेत. परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्येही घट झाली आहे. 5 वर्षांपूर्वी याचा वाटा 40% होता, तर आता तो फक्त 18% राहिला आहे. कोल्डप्ले आणि एड शीरन यांचे हाऊसफुल्ल कॉन्सर्ट हे भारतात Experience Economy वाढत असल्याचे लक्षण मानले जात आहे.
advertisement
टॉप 10% लोकांच्या हाती देशाची 57.7% संपत्ती
‘डेक्कन हेराल्ड’च्या अहवालानुसार 1990 मध्ये भारतातील टॉप 10% लोक देशाच्या 34% संपत्तीचे मालक होते. जी 2025 मध्ये वाढून 57.7% झाली आहे. दुसरीकडे खालच्या 50% लोकांचा आर्थिक संपत्तीतील वाटा 22.2% वरून 15% पर्यंत घसरला आहे.
भारत अजूनही चीनच्या 13 वर्ष मागे!
भारतातील ग्राहकवर्गाचा खर्च वाढत असला तरी देश अजूनही चीनच्या तुलनेत 13 वर्ष मागे आहे. 2023 मध्ये भारताची प्रति व्यक्ती खर्च करण्याची क्षमता 1 हजार 493 डॉलर होती. तर चीनने 2010 मध्येच 1 हजार 597 डॉलरचा टप्पा गाठला होता. ही आकडेवारी पाहता भारताचा विकास आणि आर्थिक समृद्धी ही फक्त काही टक्के लोकांच्या हाती आहे. त्यामुळे 2047 पर्यंत भारत खरोखरच विकसित राष्ट्र होईल का, हा मोठा प्रश्न आहे!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Indian Economy: 90% लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण होत नाहीत; देश कोण चालवतंय? धक्कादायक Report