दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक फ्रायडे', गुंतवणूकदारांचे 6.90 लाख कोटी बुडाले; शेअर्स पत्त्यांसारखे का कोसळले? जाणून घ्या 7 मोठी कारणे
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Indian Markets Crashed: शेअर बाजारात शुक्रवारी अचानक आलेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. सेन्सेक्स-निफ्टीने महत्त्वाचे स्तर गमावत अवघ्या एका सत्रात लाखो कोटी रुपयांचे मूल्य पुसले गेले.
मुंबई: शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल ७७० अंकांनी कोसळून ८१,५३८ वर बंद झाला, तर निफ्टी २५,१०० चा महत्त्वाचा आधार गमावत २५,०४९ वर स्थिरावला. सलग १३ सत्रांपासून सुरू असलेली एफआयआयंची विक्री, कमकुवत तिमाही निकाल, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ आणि जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळला आहे.
यातच रुपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळी गाठली, तर बँकिंग आणि अदानी समूहातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. या सर्व कारणांचा एकत्रित फटका बाजाराला बसला. परिणामी, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,५८,४२,८४२.६१ कोटी रुपयांवरून थेट ४,५१,५३,७२२.४६ कोटी रुपयांपर्यंत घसरले. अवघ्या एका सत्रात गुंतवणूकदारांचे सुमारे ६.९० लाख कोटी रुपये बुडाले.
advertisement
मिडकॅप आणि बँकिंग निर्देशांकांनाही मोठा फटका बसला. मिडकॅप निर्देशांक १,०४६ अंकांनी घसरून ५७,१४६ वर बंद झाला, तर निफ्टी बँक ७२७ अंकांनी पडत ५८,४७३ वर स्थिरावला. निफ्टीतील जवळपास ४० शेअर्स लाल निशाणात बंद झाले आणि सर्वच सेक्टोरल निर्देशांक दबावात राहिले.
घसरणीतही काही शेअर्स चमकले
आठवडाभराच्या जोरदार दबावातही काही मिडकॅप शेअर्सनी चांगली कामगिरी केली. हिंदुस्तान झिंक, बजाज कंझ्युमर, अशोक लेलँड आणि बंधन बँक या शेअर्समध्ये ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याने हिंदुस्तान झिंकमध्ये ४ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली.
advertisement
बाजार का कोसळला? जाणून घ्या ७ मोठी कारणे
शुक्रवारचा ट्रेडिंग सत्र भारतीय बाजारांसाठी अत्यंत जड ठरला. ही घसरण एका कारणामुळे नव्हे, तर अनेक नकारात्मक घटक एकाचवेळी सक्रिय झाल्यामुळे झाली.
1) एफआयआयंची सलग विक्री
परदेशी गुंतवणूकदारांची विक्री थांबण्याचे नाव घेत नाही. केवळ गुरुवारीच एफआयआयंकडून २,५४९.८० कोटी रुपयांची नेट विक्री झाली. जानेवारीतील सलग १३ वे सत्र हे विक्रीचे ठरले. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे डॉ. व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, कॉर्पोरेट नफ्यात ठोस सुधारणा होईपर्यंत एफआयआयंचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
2) कमकुवत तिमाही निकाल
आयसीआयसीआय बँक आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजसारख्या दिग्गज कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमजोर निकाल बाजारासाठी नकारात्मक ठरले. इंडेक्सवरील मोठे शेअर्स दबावात आले की बाजाराला मोठा धक्का बसतो.
3) कच्च्या तेलाच्या दरात वाढ
ब्रेंट क्रूड ०.८ टक्क्यांनी वाढून ६४.५७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तेल आयात करणाऱ्या भारतासाठी ही बाब महागाई आणि व्यापार तुटीच्या दृष्टीने चिंतेची आहे.
advertisement
4) जागतिक भू-राजकीय अनिश्चितता
ट्रम्प यांच्या निवेदनानंतर जागतिक बाजारात थोडीशी दिलासा मिळाला असला, तरी आठवडाभरात भारतीय बाजार सुमारे १.५ टक्क्यांनी खालीच राहिले. अमेरिका-युरोप संबंधांतील तणाव आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे अस्थिरता वाढली आहे.
5) अदानी समूहातील घसरण
गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात कथित फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलरच्या लाच प्रकरणी अमेरिकेच्या एसईसीकडून ईमेल समन्सची परवानगी मागितल्याच्या बातमीने अदानी समूहातील शेअर्सवर मोठा दबाव आला.
advertisement
6) बँकिंग शेअर्सची जोरदार विक्री
बँक निफ्टी जवळपास १ टक्क्यांनी घसरला. पीएनबी आणि यस बँक हे प्रमुख घसरणारे शेअर्स ठरले.
7) रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर
रुपया डॉलरच्या तुलनेत ४१ पैशांनी घसरत ९१.९९ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. एफआयआय आउटफ्लो, जागतिक तणाव आणि मजबूत डॉलरमुळे रुपयावर दबाव कायम आहे.
मोतिलाल ओसवालचे रुचित जैन यांच्या मते, निफ्टी सध्या ‘लोअर टॉप–लोअर बॉटम’ पॅटर्नमध्ये आहे. जो पुढील घसरणीचा संकेत देतो. २५,४०० हा तात्काळ रेजिस्टन्स ठरत असून, तोपर्यंत बाजारात दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 5:35 PM IST
मराठी बातम्या/मनी/
दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक फ्रायडे', गुंतवणूकदारांचे 6.90 लाख कोटी बुडाले; शेअर्स पत्त्यांसारखे का कोसळले? जाणून घ्या 7 मोठी कारणे










