किरकोळ दुकानदारांची भन्नाट आयडिया देणार मॉलला टक्कर, ग्राहकांना होणार फायदा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापुरातील किरकोळ दुकानदारांनी ग्राहकांसाठी अनोखी बक्षीस योजना जाहीर केली आहे. पाहा काय आहे ऑफर?
कोल्हापूर, 7 सप्टेंबर: वोकल फॉर लोकल अर्थात स्थानिक घटकांना प्राधान्य देण्यासाठी शासन नेहमीच नागरिकांना आवाहन करत असते. कोल्हापुरात देखील नागरिकांनी स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक किराणा दुकानदारांकडे सण-उत्सवांवेळी नागरिकांनी खरेदी करावी, यासाठी कोल्हापुरातील किरकोळ दुकानदार असोसिएशन मार्फत एक योजना राबवली जात आहे.
आजकाल कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकाच्या मनात सर्वप्रथम ऑनलाइन शॉपिंगचा विचार येतो. मग ती कोणतीही गोष्ट असो. घरात लागणाऱ्या साध्या साध्या किराणाच्या वस्तू देखील नागरिक एकतर ऑनलाईन मार्केटमधून विकत घेत आहेत. अन्यथा मॉल संस्कृतीला प्राधान्य देत आहेत. मॉलमध्ये विविध ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतो म्हणून ग्राहकांचा ओढा तिकडे जास्त असतो. पण आपल्या जवळचा दुकानदार देखील आपल्याला तितक्याच प्रमाणात मदत करतो. अडचणीच्या वेळी तोच आपल्या सगळ्यात जवळचा असतो हे देखील ग्राहकांनी ओळखायला हवे असे मत कोल्हापुरातील किरकोळ दुकानदार असोसिएशनचे जेष्ठ मार्गदर्शक बबन महाजन यांनी व्यक्त केले.
advertisement
म्हणून आणली ही योजना..
याच परिस्थितीवर उपाय म्हणून आणि किरकोळ दुकानदारांकडे प्राधान्य देऊन ग्राहकांनी तिथे खरेदी करावी, यासाठी कोल्हापुरातील किरकोळ दुकानदार असोसिएशन मार्फत श्रावण ते दिवाळी अशी एक ऑफर सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये किरकोळ दुकानदारांकडे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला काही ना काही भेटवस्तू नक्कीच मिळणार आहे. मागच्या वर्षी या योजनेला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच यंदाही ही योजना राबवण्यात येत आहे, असेही बबन महाजन यांनी स्पष्ट केले.
advertisement
काय आहे नेमकी योजना?
श्रावण ते दिवाळी या योजनेमध्ये ग्राहकांनी आपली खरेदी किरकोळ दुकानदार असोसिएशनकडे रजिस्टर असणाऱ्या कोणत्याही जवळच्या दुकानात करायची आहे. कोल्हापूर शहर आणि काही ग्रामीण भागातील दुकानदार देखील यामध्ये येतात. त्या दुकानदारांकडून जर ग्राहकाने पंधराशे रुपयांचा किराणामाल विकत घेतला. तर दुकानदार ग्राहकाला एक कुपन देईल. असे दहा कुपन गोळा करून ते दुकानदाराकडे पुन्हा जमा केले तर दुकानदार लकी ड्रॉचे एक कूपन ग्राहकाला देईल. या लकी ड्रॉमधून ग्राहकांना विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यातही लकी ड्रॉ मध्ये प्रत्येक ग्राहकाला काही ना काही बक्षीस हे मिळणारच आहे.
advertisement
काय असणार योजनेचा कलावधी?
श्रावण ते दिवाळी अशी योजना 15 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली असून 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. जे दुकानदार या योजनेत सहभागी आहेत त्या प्रत्येक दुकानदाराच्या बाहेर या योजनेचा बोर्ड लावलेला असेल. तरी 30 नोव्हेंबरनंतर या योजनेचा लकी ड्रॉ काढण्यासाठी वेळ आणि ठिकाण जाहीर केले जाईल.
advertisement
काय काय आहेत बक्षिसे?
या योजनेतून काढण्यात येणाऱ्या लकी ड्रॉसाठी विविध बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाला इलेक्ट्रिक बाइक, द्वितीय क्रमांकाला फ्रिज 2, तृतीय क्रमांकाला 1 वॉशिंग मशीन, चौथ्या क्रमांकाला 1 आटा चक्की, 10 एलईडी टीव्ही, 100 पैठणी, 50 मिक्सर, 50 पॅन सेट अशी भरपूर बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
advertisement
दरम्यान, वाजवी भावात योग्य वस्तू मिळण्यासाठी ग्राहकाने देखील आवर्जून आपल्या जवळच्या किराणा दुकानदाराकडेच खरेदी करावी. असे आवाहन देखील किरकोळ दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वीर यांच्याकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 07, 2023 2:48 PM IST

