72 तासांनंतर कसा असेल शेअर मार्केटचा मूड? दिलासा मिळणार की आणखी कोसळणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आंतरराष्ट्रीय मार्केटचा भारतीय शेअर बाजारावर सोमवारी कसा परिणाम दिसून येईल, सोमवारी दिलासा मिळणार, रिकव्हरी मोडवर येणार की पुन्हा कोसळणार याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं ते जाणून घेऊया.
मुंबई: शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम आहे. त्यात FII विक्रीचं प्रमाण वाढत असल्याने टेन्शन वाढलं आहे. त्यात भरीस भर म्हणून सलग तीन दिवस म्हणजे 72 तास भारतातील शेअर मार्केट बंद आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट शुक्रवारी सुरू राहणार आहे. तर आता भारतातलं शेअर मार्केट थेट सोमवारी उघडणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटचा भारतीय शेअर बाजारावर सोमवारी कसा परिणाम दिसून येईल, सोमवारी दिलासा मिळणार, रिकव्हरी मोडवर येणार की पुन्हा कोसळणार याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं ते जाणून घेऊया.
या वेळी तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना होळीच्या निमित्ताने गुंतवणुकीविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. प्रतिभा गिरीश म्हणाल्या, "होळीच्या दिवशी आपण पांढरे कपडे घालतो, कारण त्यावर रंग चांगले दिसतात. त्याचप्रमाणे, गुंतवणुकीतही विविध रंग म्हणजे विविध पर्याय असले पाहिजेत. पोर्टफोलिओमध्ये स्थिरता, वाढ आणि उच्च परतावा देणाऱ्या योजनांचा समावेश असावा."
फिरोज अझीझ यांनी गुंतवणुकीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, "प्रत्येक सण आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. होळीच्या निमित्ताने आपण आपल्या भविष्यातील आर्थिक योजनांचा विचार केला पाहिजे. गुंतवणूक लवकर सुरू केल्यास आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवल्यास भविष्यातील आर्थिक अडचणी टाळता येऊ शकतात. तसेच, गुंतवणूकदारांनी केवळ एकाच प्रकारच्या मालमत्तेवर अवलंबून न राहता विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी."
advertisement
गुंतवणूकदारांच्या सामान्य प्रश्नांना उत्तरे देताना प्रतिभा गिरीश म्हणाल्या, "गुंतवणूकदारांनी एसआयपी (SIP) थांबवू नये. बाजारात चढ-उतार होत असले तरी एसआयपी सुरू ठेवल्यास दीर्घकाळात चांगला परतावा मिळतो. तसेच, एकरकमी गुंतवणूक (Lump sum investment) करायची असल्यास एस.टी.पी. (STP) चा पर्याय निवडावा. यामुळे बाजारातील अस्थिरतेचा धोका कमी होतो."
गुंतवणुकीसाठी योग्य योजनांची निवड करताना फिरोज अझीझ यांनी सांगितले, "गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार योजना निवडाव्यात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी योजना (Equity plans) चांगल्या असतात, तर कमी जोखमीसाठी डेट योजना (Debt plans) उपयुक्त ठरतात. गुंतवणूकदारांनी एच.डी.एफ.सी. फ्लेक्सी कॅप (HDFC Flexi Cap), डी.एस.पी. इक्विटी ऑपर्च्युनिटीज (DSP Equity Opportunities), कोटक इमर्जिंग इक्विटी (Kotak Emerging Equity) आणि इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप (Invesco India Small Cap) यांसारख्या योजनांचा विचार करावा."
advertisement
शेवटी, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना संयम आणि शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले, "गुंतवणूक करताना भावनांवर ताबा ठेवा. मागील कामगिरीच्या आधारावर गुंतवणूक करू नका आणि गरजेपेक्षा जास्त विविधता टाळा. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आणि योग्य योजना निवडल्यास गुंतवणूकदारांना नक्कीच चांगला परतावा मिळेल."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 14, 2025 1:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
72 तासांनंतर कसा असेल शेअर मार्केटचा मूड? दिलासा मिळणार की आणखी कोसळणार?