Ajit Pawar: 'काय बावळटांचा बाजार लावलाय...' अजित पवार कमालीचे संतापले, मंत्रालयात घडला अजब प्रकार
- Published by:sachin Salve
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तेही अजित पवार यांच्या दादागिरीचा चांगालाच वचक असलेल्या मंत्रालयातच अजित पवारांची फट-फजिती बघायला मिळाली,
मुंबई: मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नेहमीच VIP बडदास्त सर्वांनाच पहायला मिळते. मंत्रालयात मंत्र्यांचे लवाजामा सोबत येणं आणि जाणं नेहमीच सर्वांच्या कुतुहलाचा तर काहींचा टिकेचा विषय असतो. मात्र जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तेही अजित पवार यांच्या दादागिरीचा चांगालाच वचक असलेल्या मंत्रालयातच अजित पवारांची फट-फजिती बघायला मिळाली, आणि त्यामुळे अजितदादांनी त्यांच्या सुरक्षारक्षकांना सर्वांसमोरच धारेवर धरलं अन् चांगलंच गावरान भाषेत झापझाप झापलं. अजित दादांचा रूद्र अवतार पाहताच सुरक्षा रक्षकांची मंत्रालय आवारात धावाधाव सुरू झाली.
त्याचं झालं असं की, उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातील बैठका संपवून देवगिरी बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. अजित पवार मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येताच त्यांची कार आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा तयार नव्हता. त्यामुळे अजित पवार यांनी कार येण्याची प्रतीक्षा केली पण कार काही केल्या येत नव्हती. अजितदादा असं मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहिले पाहून मंत्रालयातली हवशे-नवशे सेल्फी घेण्यासाठी गर्दी करू लागले. त्यामुळे अजितदादा आणखीनच वैतागले आणि त्यांनी सर्वांसमोरच सुरक्षारक्षक आणि स्विय सहाय्यकांना चांगलाच दम भरला.
advertisement
मंत्रालय पायऱ्यावरच अजितदादांनी रागातच “काय बावळटांचा बाजार लावलाय, कुठे आहेत सगळे ? मी खाली आलोय हे देखील माहीत नाही का?” असं म्हणत अजितदादांनी सगळ्यांना चांगलंच खडसावलं. त्यानंतर दादांचे सुरक्षारक्षक पाय लावून मंत्रालय आवारात धावा धाव करत होते. हा सर्व तमाशा मंत्रालय आवारात तब्बल १० मिनिटं सुरू होता. पण अजितदादांची कार काही केल्या येत नव्हती.
advertisement
शेवटी वैतागून अजित पवार यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या कारमध्ये वैतागूनच बसले आणि देवगिरी बंगल्यावर रवाना झाले. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कारमध्ये बसल्यावर अजित पवार यांनी त्यांच्या सर्व कार्यालयीन सुरक्षारक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली असल्याची माहिती मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ajit Pawar: 'काय बावळटांचा बाजार लावलाय...' अजित पवार कमालीचे संतापले, मंत्रालयात घडला अजब प्रकार