Mumbai News : एक निर्णय अन् आठ वर्षाच्या मेहनतीवर पाणी; प्रभादेवीत घटनेने सर्वत्र हादरले
Last Updated:
Mumbai Crime News : प्रभादेवीतील ई-कॉमर्स कार्यालयात बायोमेट्रिक लॉक तोडून चोरट्यांनी 1 कोटी 33 लाख रुपयांची रोकड लंपास केली. दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. एका ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी बायोमेट्रिक लॉक तोडून तब्बल 1 कोटी 33 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
एका रात्रीत कोट्यवधींची चोरी
या प्रकरणातील तक्रारदार सागर रामसजन दुबे (वय 27) हे त्यांच्या दोन मित्रांसोबत 2018 पासून प्रभादेवी येथील सनशाईन टॉवरमधील कार्यालयात ई-कॉमर्स व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कंपनीत मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन तसेच ऑफलाइन विक्री केली जाते. या विक्रीतून मिळणारी रोकड कार्यालयातील कपाटात ठेवली जात होती.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने मोठी रक्कम बँकेत जमा करण्यात आलेली नव्हती. 16 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता कार्यालय बंद करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले असता बायोमेट्रिक मशीन तुटलेले दिसून आले.
advertisement
कार्यालयाच्या काचेच्या दरवाजाला बाहेरून लॉक असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ मालकांना माहिती दिली. दुबे आणि त्यांचे सहकारी कार्यालयात पोहोचले असता कपाटातील संपूर्ण रोकड चोरीला गेल्याचे उघड झाले.
चोरट्यांनी हायटेक पद्धतीने दिला पोलिसांना चकवा
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे दिसून आले की, चोरट्यांनी आधी बायोमेट्रिक लॉकचा वीजपुरवठा बंद करून ते निकामी केले. त्यानंतर बनावट चावीच्या मदतीने त्यांनी कार्यालयात प्रवेश केला आणि कपाट फोडून चोरी केली. या घटनेमुळे प्रभादेवी परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 1:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : एक निर्णय अन् आठ वर्षाच्या मेहनतीवर पाणी; प्रभादेवीत घटनेने सर्वत्र हादरले










