व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी पळसदरी डॅममध्ये तरुणीचा मृतदेह; कर्जत तालुक्यात खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तरुणीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
संतोष दळवी, प्रतिनिधी
मुंबई : कर्जत तालुक्यातील पळसदरी धरणात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी महाशिवरात्रीच्या दिवशी ही घटना उघडकीस आली. अंदाजे 20 ते 22 वयोगटातील या तरुणीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ कर्जत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह हेल्प फाउंडेशनच्या पथकाने संयुक्तपणे प्रयत्न करत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
advertisement
प्राथमिक तपासात ही तरुणी कर्जत तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट झाले असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे ही तरुणी कर्जत तालुक्याबाहेरील असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
मृत्यूचे नेमके कारण काय?
काल व्हॅलेंटाईन डे असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा तपास त्या अनुषंगानेही केला जात आहे. आत्महत्या, अपघात की घातपात, या तिन्ही शक्यतांचा विचार करून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेहावर कोणतीही गंभीर जखम आढळली आहे का? तसेच मृत्यूचे नेमके कारण काय? याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे. मृतदेह सध्या कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पळसदरी धरण परिसरात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
शवविच्छेदन अहवालानंतर अधिक तपशील समोर येणार
घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले असून तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास कर्जत पोलीस करत असून मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काही तासांत शवविच्छेदन अहवालानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 6:33 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी पळसदरी डॅममध्ये तरुणीचा मृतदेह; कर्जत तालुक्यात खळबळ










