राज्य सरकारचा गेमचेंजर प्लॅन, मुंबई ते लातूर प्रवास सुसाट होणार, 6 जिल्ह्यांतून...
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Latur Expressway: नव्या महामार्गामुळे मुंबई, ठाणे परिसर आणि मराठवाडा यांच्यातील अंतर व प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
मुंबई: मुंबई ते लातूर प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर एमएसआरडीसीने महामार्गाच्या संरेखनाचे काम प्रत्यक्ष सुरू केले आहे. हा महामार्ग एकूण सहा जिल्ह्यांतून जाणार असून त्याचा लाभ ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांतील अनेक तालुके व शहरांना होणार आहे.
एमएसआरडीसीच्या सुमारे चार हजार किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रस्ते प्रकल्पांमध्ये कल्याण–लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश अनेक वर्षांपूर्वी करण्यात आला होता. मात्र दीर्घकाळ हा प्रकल्प कागदावरच मर्यादित राहिला होता. अलीकडे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाविषयी सादरीकरण पाहिल्यानंतर प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विधानसभेत अधिकृत घोषणा करून या महामार्गाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करण्यात आला.
advertisement
मराठवाड्याचा, विशेषतः लातूर जिल्ह्याचा विकास वेगाने साधावा या उद्देशाने या महामार्गाला “जनकल्याण महामार्ग” असे नाव देण्यात आले आहे. या मार्गामुळे मुंबई, ठाणे परिसर आणि मराठवाडा यांच्यातील अंतर व प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
राज्य सरकारच्या मंजुरीनंतर एमएसआरडीसीने सल्लागारांच्या माध्यमातून संरेखनाचे काम सुरू केले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. उपलब्ध माहितीनुसार हा महामार्ग उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा या भागांतून जाणार आहे. पुढे तो महाराष्ट्र–कर्नाटक सीमावर्ती भागापर्यंत विस्तारण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
advertisement
दरम्यान, अंतिम संरेखन जाहीर झाल्यानंतरच महामार्गाचा नेमका मार्ग, बाधित क्षेत्रे आणि पुढील टप्प्यांबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हा महामार्ग प्रत्यक्षात आल्यास मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
राज्य सरकारचा गेमचेंजर प्लॅन, मुंबई ते लातूर प्रवास सुसाट होणार, 6 जिल्ह्यांतून...











