बाप्पा मोरया! मुंबईत माघी गणेशोत्सवाचा जल्लोष, इथं साकारलंय हुबेहूब गणपतीपुळे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
Magh Ganesh Utsav: मुंबईत माघी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. खापरदेव मंडळाच्या गणेश दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई: दरवर्षी गणेशोत्सव आणि माघी गणेशोत्सव हे दोन्ही उत्सव मुंबईमध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यंदाच्या वर्षी 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या दिवशी गणरायाचे आगमन होणार आहे. घरगुती आणि मंडळाचे गणपती या दिवसांमध्ये विराजमान होतात. मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की गणरायाच्या आगमनाची आणि सजावटीची कुठलीच कमतरता नसते. मुंबईमध्ये सध्या माघी गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. करी रोडच्या खापरदेव मंडळांनने यंदाच्या वर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिराची हुबेहूब कलाकृती साकारली आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
खापरदेव मंडळाची 1980 साली स्थापना झाली. माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाच्या विराजमानाची सुरुवात 2001 पासून झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त खापरदेव मंडळ सर्व पारंपारिक पूजा विधी कार्यक्रम करत असतात. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात गणरायाच्या दिवसाला दोन आरती होतात. सकाळी साडेपाच वाजता एक आणि संध्याकाळी साडेसात वाजता आरती पार पडते. फक्त सोसायटीतील रहिवासी नाही तर सर्वच विभागातील रहिवासी या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
advertisement
गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती
गणपतीपुळे मंदिराची कलाकृती साकारण्यासाठी या मंडळातील सर्वच सदस्यांना दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला. “मुंबईत आतापर्यंत कोणीही गणपतीपुळे मंदिराची कलाकृती साकारली नव्हती म्हणून आम्ही या मंदिराची कलाकृती साकारण्याचा निर्णय घेतला. सकाळची काकड आरती पार पडणारे मुंबईतील खापरदेव मित्र मंडळ हे एकमेव मंडळ आहे,” असे मंडळाचे सरचिटणीस पद्माकर कुवेस्कर यांनी सांगितले.
advertisement
गणपतीपुळे मंदिराची कलाकृती पाहण्यासाठी सर्वच भाविक या ठिकाणी गर्दी करत आहेत. जर तुम्हाला देखील गणपतीपुळे येथील मंदिराची हुबेहूब कलाकृती पाहायची असेल तर करी रोडच्या खापरदेव मंडळाला नक्की भेट द्या. करी रोड रेल्वे स्थानकापासून दोन मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या मंडळात गेल्यानंतर चारही बाजूंनी केशरी रंगांच्या भिंती, भिंतींवरती गणरायाची वेगवेगळी रूपं आणि डोळे दिपवणारा मंदिराचा अनुभव इथे तुम्हाला लाभेल. इथे भेट दिल्यावर रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिराला भेट दिल्याचा अनुभव मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 02, 2025 9:10 PM IST