गे डेटिंग ॲपवर भेट झाली, त्याच्या प्रेमात वेडा झाला अन् भेटायला मुंबईतून IIT कानपूरला गेला, आणि...
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
आदेशला मूळगंज चौकात सोडलं, यानंतर आदेश गायब झाला. बरीच शोधाशोध करूनही त्याच्याबद्दल काहीच कळालं नाही.
मुंबई: मुंबईतील एका फॅशन डिझायनर तरुणाची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने 16 वर्षांनी निकाल दिला आहे. 2008 साली मुंबईच्या आदेश बाजपेयीचा लखनऊमध्ये खून झाला होता. या घटनेत 16 वर्षांनी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. आदेशचा खून करणारा आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी राहुल वर्माला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अनुरोध मिश्रा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला 75 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
आदेश हा मुंबईत फॅशन डिझायनर होता. एका गे डेटिंग ॲपद्वारे त्याची राहुल वर्माशी ओळख झाली. राहुल आयआयटी कानपूरमध्ये शिकत होता. 4 ऑगस्ट 2008 रोजी आदेश राहुलला भेटण्यासाठी लखनऊला आला. यानंतर आदेश कानपूरला त्याच्या मामाच्या घरी गेला. चुलत भाऊ विवेक त्रिवेदीने 10 ऑगस्ट 2008 रोजी आदेशला मूळगंज चौकात सोडलं, यानंतर आदेश गायब झाला. बरीच शोधाशोध करूनही त्याच्याबद्दल काहीच कळालं नाही.
advertisement
विवेकने 13 ऑगस्ट 2008 रोजी फोन करून आदेश बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. पाच दिवसांनी आदेशचे वडील सूर्य कुमार कानपूरला पोहोचले. त्यांनी तत्कालीन एसएसपींची भेट घेतली. एसएसपीच्या आदेशानुसार, मूळगंज पोलीस ठाण्यात आदेशच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला.
आयआयटी कॅम्पसमध्ये सापडला पुरुषाचा सांगाडा
23 ऑगस्ट 2008 रोजी आयआयटी कॅम्पसमध्ये मानवी सांगाडा सापडला. सांगाड्याची ओळख पटू शकली नाही. आयआयटीच्या सुरक्षा अधिकाऱ्याने कल्याणपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आणि सांगाडा पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. हे प्रकरण थंडावल्याचे दिसताच पीडित सूर्य कुमार यांनी न्यायासाठी हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर 8 ऑक्टोबर 2010 रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला आणि या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड झाली. मग पुरावे आणि साक्षीदार गोळा केल्यानंतर सर्वांना कोर्टात हजर करण्यात आलं.
advertisement
44 साक्षीदार आणि पुरावे
या प्रकरणात आरोपीला शिक्षा देण्यासाठी सीबीआयने 44 साक्षीदार, 66 कागदपत्रं आणि 16 पुरावे कोर्टात सादर केले. सीबीआयने आयआयटीमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी केली, ज्यामध्ये सांगाडा आदेशचा असल्याचं स्पष्ट झालं. मोबाईल फोनचे डिटेल्स आणि ॲप हिस्ट्रीतून पुरावे गोळा करण्यात आले. यानंतर राहुल वर्माला जानेवारी 2012 मध्ये अटक करण्यात आली. राहुलला भेटण्यासाठी आदेश मुंबईहून लखनऊला आल्याचं चौकशीत उघड झालं. तिथून राहुलने आदेशला आयआयटी कानपूरमध्ये नेलं आणि त्याची हत्या केली. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्यावर केमिकल टाकून त्याचा मृतदेह जाळला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2024 9:42 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
गे डेटिंग ॲपवर भेट झाली, त्याच्या प्रेमात वेडा झाला अन् भेटायला मुंबईतून IIT कानपूरला गेला, आणि...







