मुंबईत डॉक्टर तरुणीने संपवलं जीवन, DY Patil रुग्णालयात करत होती काम, मित्राला धरलं जबाबदार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नवी मुंबईतील प्रसिद्ध डी. वाय. पाटील रुग्णालयात दंत चिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका २४ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे.
मुंबई: मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील प्रसिद्ध डी. वाय. पाटील रुग्णालयात दंत चिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका २४ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉ. स्तुती देशमाने असं या मृत डॉक्टर तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळं वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. स्तुती देशमाने या अँटॉप हिल येथील आपल्या घरी पालकांसोबत राहत होत्या. रविवारी रात्री आठच्या सुमारास स्तुतीचा तिच्या पालकांशी शेवटचा संवाद झाला होता. त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. सोमवारी सकाळी स्तुतीची एक मैत्रीण तिला वारंवार फोन करत होती, मात्र स्तुतीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे तिने स्तुतीच्या पालकांना फोन केला.
advertisement
पालकांनी स्तुतीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, परंतु आतून कोणतीही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कुटुंबीयांनी काही शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, स्तुती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे दृश्य पाहून पालकांना मोठा धक्का बसला. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली.
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता पोलिसांना स्तुतीच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या काही घडामोडींना कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं नमूद केलं आहे. विशेष म्हणजे, तिने आपल्या मृत्यूला एका मित्राला जबाबदार धरलं आहे.
advertisement
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी संबंधित मित्राला तत्काळ ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी डॉ. स्तुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. वैयक्तिक आयुष्यातील तणावातून एका तरुण डॉक्टरने आपले जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता त्या मित्रासोबत स्तुतीचे नेमके काय संबंध होते आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले का, या दिशेने तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 8:03 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत डॉक्टर तरुणीने संपवलं जीवन, DY Patil रुग्णालयात करत होती काम, मित्राला धरलं जबाबदार






