मुंबईत आता पाणीकपात नाही! पालिकेचा १०० मीटर खोल जमिनीतील मास्टर प्लॅन, कसा होणार फायदा?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: रस्ते खोदकाम किंवा अन्य विकासकामांमुळे जलवाहिन्या फुटण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे पाणीपुरवठा सुरुळीत होईल.
मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्या आता जीर्ण झाल्या आहेत. त्यातून वारंवार होणाऱ्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. ही समस्या दूर करून मुंबईला अधिक सुरक्षित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कशेळी ते मुलुंड (जकात नाका) दरम्यान जलबोगदा उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या प्रकल्पाला सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) ने मंजुरी दिली आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज सुमारे 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एकट्या भातसा धरणातून सुमारे 2000 दशलक्ष लिटर पाणी येते. त्यातील 1365 दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत वितरित केले जाते. मात्र मुंबई–नाशिक महामार्गाचे रुंदीकरण तसेच वाढती शहरी विकासकामे यामुळे जमिनीवरील मुख्य जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे.
advertisement
याच पार्श्वभूमीवर महापालिकेने कशेळी ते मुलुंड दरम्यान अतिरिक्त क्षमतेसह भूमिगत जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याच्या एकूण क्षमतेत वाढ होणार नसली तरी सध्याच्या जलवाहिन्यांचे जाळे बॅकअप स्वरूपात वापरता येणार आहे. ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांतून येणाऱ्या जमिनीवरील जलवाहिन्यांना भविष्यातील धोके टाळण्यासाठी हा जलबोगदा महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
हा जलबोगदा जमिनीखाली सुमारे 100 मीटर खोलीवर बांधण्यात येणार असून त्यामुळे रस्ते खोदकाम किंवा अन्य विकासकामांमुळे जलवाहिन्या फुटण्याची शक्यता कमी होईल. सध्या मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी 380 किलोमीटर लांबीचे बाह्य जलवाहिनी जाळे आणि सुमारे 20 किलोमीटर भूमिगत जाळे आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्ती कामांमुळे निर्माण होणारे अडथळे टाळण्यासाठी जलबोगद्यांचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, भिवंडी तालुक्यातील पिसे गावात 455 दशलक्ष लिटर क्षमतेचे पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार असून या पिकअप वेअर प्रकल्पालाही केंद्र सरकारची सीआरझेड मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याला अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह आधार मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 8:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत आता पाणीकपात नाही! पालिकेचा १०० मीटर खोल जमिनीतील मास्टर प्लॅन, कसा होणार फायदा?






