मुंबईकर प्रतीक्षा संपणार, वाहतूक कोंडी सुटणार, सायन पुलाचा मुहूर्त ठरला, वाहने कधी धावणार?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: मुंबईतल्या हजारो वाहनचालकांना शॉर्टकट मार्ग बंद असल्याने रोज लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता.
मुंबई: सायन रेल्वे पुलाकडे गेली अनेक वर्षे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले होते. मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा पूल बंद आहे. त्यामुळे सायन परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. रोज हजारो वाहनचालकांना शॉर्टकट मार्ग बंद असल्याने लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे आणि त्याच्या उद्घाटनाकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले होते. अखेर या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे.
पुनर्बांधणीचा प्रस्ताव आणि जबाबदारी
सायन रेल्वे स्थानकाजवळील हा पूल रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवरून जातो. त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून देण्यात आला होता. त्यानुसार या पुलाचे काम रेल्वेने मुंबई महापालिकेकडे सोपवले आहे. पुलाचे मुख्य बांधकाम करण्यासाठी लागणारा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे. मात्र पुलाला जोडणारे रस्ते म्हणजेच पुलावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी लागणारे रस्ते तयार करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर देण्यात आली आहे.
advertisement
बांधकाम पद्धतीत बदल आणि वाढलेला खर्च
या जोड रस्त्यांचे काम करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे सुरुवातीला ठरवलेली बांधकाम पद्धत बदलावी लागली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चातही वाढ झाली. या बदलांसाठी मध्य रेल्वेकडून आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे. या बदलांमुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात सुमारे 7 कोटी रुपयांची वाढ झाली असून आता हा खर्च जवळपास 49 कोटी 96 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
सध्या पुलाचे आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी पोहोच रस्त्याचा आराखडा, नियोजन आणि संकल्पचित्रे तयार करण्यासाठी स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोहोच रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम नीरज सिमेंट स्ट्रक्चरल लि. या कंपनीकडे देण्यात आले असून या कामाची किंमत सुमारे 21 कोटी 44 लाख रुपये इतकी आहे.
advertisement
लवकरच वाहतुकीसाठी खुला
सध्या उर्वरित कामे वेगाने पूर्ण केली जात असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 15 ऑगस्टपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर सायन परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून शहर आणि उपनगरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 8:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर प्रतीक्षा संपणार, वाहतूक कोंडी सुटणार, सायन पुलाचा मुहूर्त ठरला, वाहने कधी धावणार?







