बघतोच तुला...! शौचालय वापराचे 2 रुपये मागितले, नवी मुंबईतील कर्मचाऱ्यासोबत काय घडले?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Navi Mumbai News: नवी मुंबईत शौचालय वापराचे दोन रुपये मागितल्याने वाद झाला. एकाने चार-पाच जणांसह कर्मचाऱ्याला मारहाण केली असून गुन्हा दाखल झाला आहे.
नवी मुंबई: किरकोळ कारणांतून वादाच्या घटनांमध्ये होणारी वाढ सध्या चिंतेचा विषय बनली आहे. नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरात सार्वजनिक शौचालय वापराचे फक्त दोन रुपये मागितले, यासाठी एका कर्मचाऱ्याला मारहाण झाली. ही घटना बुधवारी रात्री गणेशनगर परिसरात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची देखभाल रमेश राम हे करतात. बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना परिसरातील मस्तान शेख नावाचा तरुण शौचालय वापरून बाहेर पडला. यावेळी रमेश यांनी नेहमीप्रमाणे दोन रुपयांचा वापर शुल्क मागितले असता शेख संतापला. त्याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि “बघतोच तुला” अशी धमकी देत तेथून निघून गेला.
advertisement
काही वेळानंतर तो पुन्हा आपल्या पाच ते सहा साथीदारांसह घटनास्थळी परत आला. या सर्वांनी मिळून रमेश यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व त्यानंतर पळ काढला. या घटनेत रमेश यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनी त्वरित तुर्भे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
advertisement
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मस्तान शेख व त्याच्या साथीदारांविरुद्ध मारहाणीचा व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सार्वजनिक ठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
तुर्भे परिसरात घडलेली ही घटना पुन्हा किरकोळ कारणावरून वाढणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचे उदाहरण ठरली आहे. पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
November 07, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बघतोच तुला...! शौचालय वापराचे 2 रुपये मागितले, नवी मुंबईतील कर्मचाऱ्यासोबत काय घडले?


