पनवेल-कर्जत प्रवास आता अवघ्या 40 मिनिटांत, कधी सुरु होणार मार्ग; वाचा संपूर्ण A टू Z माहिती
Last Updated:
Panvel karjat Rail Line : लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या एका चर्चेत असलेल्या लोकल मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे वेळेतही मोठी बचत होणार आहे.
नवी मुंबई : मुंबई शहरात लोकल ट्रेन हे एक महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. मात्र याच मार्गातील सध्या महत्त्वाच्या प्रकल्पातील अपडेट आलेली आहे. तो सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडोर.
कधी पासून येणार प्रवाशांच्या सेवेत?
पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडोरचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रवाशांचा प्रतीक्षा काळ लवकरच संपण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या मार्गाची एकूण लांबी 29.6 किलोमीटर आहे. डबल लाईन ट्रॅकपैकी जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान दोन रेल्वे फ्लायओव्हर बांधण्यात आले असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच तीन बोगदे तयार करण्यात आले आहेत. या बोगद्यांची एकत्रित लांबी 3.2 किलोमीटर असून त्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 2,782 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
advertisement
अशी असतील स्थानके
या मार्गावर 5 रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि 15 रोड अंडर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला पनवेल, चिखले, पोएंजे, चौक आणि कर्जत ही स्थानके या मार्गावर असतील. स्थानकांचे बांधकामही वेगाने सुरू आहे.
प्रवासाच्या वेळेत मोठी बचत
हा मार्ग सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वे अंतर्गत सध्या सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कर्जत (कल्याणमार्गे) मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. पनवेल स्थानकावरून एस्केलेटरद्वारे थेट कर्जत लाईनला जाता येईल. सध्या रस्त्याने कर्जतला जाण्यास दीड तास लागतो, मात्र नवीन रेल्वेमुळे हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करता येणार आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये कामासाठी येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 1:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पनवेल-कर्जत प्रवास आता अवघ्या 40 मिनिटांत, कधी सुरु होणार मार्ग; वाचा संपूर्ण A टू Z माहिती










