Mumbai Crime : दादरमध्ये 'स्पेशल 26'; नोकरानेच घरावर फेक रेड टाकत लुटले लाखो; पायांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. कॅमेऱ्यात सुटकेस घेऊन जाणाऱ्या तोतया अधिकाऱ्याच्या शेजारी एक लंगडत चाललेली व्यक्ती अस्पष्ट दिसली
मुंबई : बॉलिवूड चित्रपट स्पेशल-26 सारखंच एका व्यक्तीच्या घरावर फेक रेड टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दादरमध्ये सीआयडी ऑफिसर असल्याचं सांगत काही भामट्यांनी एका घरावर रेड टाकत पैसे लंपास केले होते. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. कॅमेऱ्यात सुटकेस घेऊन जाणाऱ्या तोतया अधिकाऱ्याच्या शेजारी एक लंगडत चाललेली व्यक्ती अस्पष्ट दिसली. यावरुनच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणातील तक्रारदारच्या बहिणीचा नवरा आणि व्यावसायिकाच्या घरातील जुना नोकर असलेला दान बहादूर जोरा हा त्याचवेळी अशाच प्रकारे लंगडत तिथे आला आणि पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
खरं तर व्यावसायिक राजन शंकर जाधव यांनी सीबीआय कारवाईच्या भीतीने आपल्याकडे असलेले 20 लाख रूपये आपला विश्वासू नोकर किरण याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. ही बाब किरणची बहीण आणि दाजी दान बहादूर जोरालाही माहिती होती. यानंतर जोरा याने कट रचत आणखी तिघांना सोबत घेऊन हे सगळं घडवून आणलं.
advertisement
जोराने आपला घाटकोपरचा मित्र लालू याला याबद्दल सांगितलं. त्यांनी पनवेलमधील मित्र प्रताप रतन सिंहच्या मदतीने फेक रेड टाकण्याचं ठरवलं. प्रतापने सांगितलं, की माझा मित्र दान सिंग देबीसिंग अधिकाऱ्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याचीही मदत घेण्यात आली. प्लॅननुसार, रविवारी पहाटे ते सीआयडी ऑफिसर म्हणून किरणच्या घरी गेले आणि धाड टाकून पैशांवर हात साफ केला. यानंतर चौघांनी प्रत्येक 5 लाख रूपये वाटून घेतले. एकाने या पैशांनी उधारी चुकवली तर एकाने ते बारमध्ये उडवले. जोरा आणि लालूकडील १० लाख रूपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2024 10:25 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : दादरमध्ये 'स्पेशल 26'; नोकरानेच घरावर फेक रेड टाकत लुटले लाखो; पायांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा








