Mumbai : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं! 18 वर्षांचा वनवास संपला; अखेर मिळाली सरकारी नोकरी
Last Updated:
26/11 Mumbai Terror Attack : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या वडिलांना गमावलेल्या अनुष्का प्रकाश मोरे यांना अखेर सरकारी नोकरी मिळाली आहे. या निर्णयाने शहीद कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात शौर्याने लढत वीरमरण प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या कन्येला अखेर राज्य प्रशासनात स्थान मिळाले आहे. अनुष्का प्रकाश मोरे यांची राज्य प्रशासकीय सेवेत औषध निर्माता गट ब या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी विशेष नियम शिथिल करत सहमती दर्शवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक, पोलीस अधिकारी आणि जवानांनी आपले प्राण गमावले. त्या वेळी प्रकाश पांडुरंग मोरे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी दहशतवाद्यांशी प्रतिकार करताना शौर्याने वीरमरण पत्करले. त्यांच्या या बलिदानाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती.
advertisement
अनुष्का मोरे यांनी बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्य विभागाच्या मुंबई शहर कार्यालयात औषध निर्माता (गट ब) पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी एमपीएससीच्या नियमांनुसार निवड प्रक्रिया आवश्यक असली तरी विशेष बाब म्हणून आयोगाने नियम शिथिल करून त्यांना ही संधी देण्यास मान्यता दिली आहे.
advertisement
आज अनुष्का मोरे यांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात त्या आपली सेवा बजावणार आहेत. या निर्णयामुळे 26/11 च्या हल्ल्यात प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीराचा सन्मान पुन्हा अधोरेखित झाला आहे.
राज्य सरकारकडून मिळालेल्या या नियुक्तीमुळे मोरे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. वडिलांनी देशासाठी प्राण दिले, आणि आज त्याच त्यागामुळे आम्हाला शासकीय सेवेत स्थान मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे अनुष्का मोरे यांनी सांगितले.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीला आपली मंजुरी देताना म्हटले आहे की,''शूर जवानांच्या कुटुंबीयांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. अनुष्का मोरे यांची नियुक्ती हा त्यांच्या वडिलांच्या शौर्याला दिलेला सन्मान आहे.'' या निर्णयामुळे 26/11 च्या हल्ल्यात बलिदान दिलेल्या सर्व शहीद कुटुंबांना नवा दिलासा मिळाला आहे. अनुष्का मोरे यांचे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून शासकीय सेवेत त्यांचा प्रवास हा देशसेवेचा वारसा पुढे नेणारा ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं! 18 वर्षांचा वनवास संपला; अखेर मिळाली सरकारी नोकरी