जामीनदार बदलला आणि राहुल गांधींना पुन्हा मिळाला दिलासा! भिवंडी कोर्टात नेमकं काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर; जामीन प्रक्रिया, आरएसएस मानहानी खटला, भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे, काँग्रेस-भाजपमध्ये शाब्दिक युद्ध, मनोज प्रधान यांची प्रतिक्रिया.
RSS बद्दल केलेल्या एका विधानावरून सुरू असलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर झाले. त्यांचे जुने जामीनदार आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांच्या निधनामुळे राहुल गांधींचा जामीन तांत्रिकदृष्ट्या रद्द झाला होता. त्यामुळे आज त्यांना पुन्हा नवीन जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. एका जाहीर सभेत भाषण करताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राहुल गांधींचे हे वक्तव्य संघाची जाणीवपूर्वक बदनामी करणारे आहे, असा दावा करत आरएसएसचे स्थानिक स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. ९ वर्षांपासून यावर भिवंडी कोर्टात सुनावणी सुरू आहे.
advertisement
राहुल गांधी विरोधी पक्षनेते असल्याने भिवंडी न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कोर्टात येण्यापूर्वी ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध पेटलं इतकंच नाही तर राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण वादावर काँग्रेस नेते मनोज प्रधान यांनी भाजपवर टीका केली. "राहुल गांधी हे देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना अशा पद्धतीने काळे झेंडे दाखवणे अत्यंत चुकीचे आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली
advertisement
भाजपच्या धोरणांना विरोध केला की थेट 'देशविरोधी' किंवा 'शहरी नक्षलवादी' ठरवण्याचा नवा ट्रेंड आणला जात आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. राहुल गांधी हे देशप्रेमी असून ते सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. ठाण्यात जो प्रकार घडला, त्याबद्दल आम्ही ठाणेकर नागरिकांच्या वतीने राहुल गांधींची माफी मागतो. मात्र, पुन्हा असा प्रकार घडला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल," असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 12:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
जामीनदार बदलला आणि राहुल गांधींना पुन्हा मिळाला दिलासा! भिवंडी कोर्टात नेमकं काय घडलं?







