Christmas 2025: 'जिंगल बेल' महाराष्ट्रीयन तरुणांची कमाल, नाताळासाठी मराठीत तयार केली गाणी!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Jingle Bell In Marathi: ख्रिसमस किंवा नाताळ म्हटलं की सांताक्लॉज आणि इंग्रजी कॅरोल्स हेच चित्र डोळ्यासमोर येते. मात्र अनेकांना माहिती नाही की मराठी भाषेतही नाताळासाठी खास अशी सुंदर, भावपूर्ण आणि परंपरागत कॅरोल्स म्हणजेच नाताळगीते लिहिली गेली आहेत.
मुंबई: डिसेंबर महिना सुरू झाला की, वर्षाच्या शेवटचा आनंदी काळ सुरु होतो. संपूर्ण महिनाभर नाताळाची तयारी, घराघरांत सजावट, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, रंगीबेरंगी गिफ्ट्स आणि “जिंगल बेल, जिंगल बेल” या गाण्यांचा उत्साह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालतो. आपल्याकडे ख्रिसमस किंवा नाताळ म्हटलं की सांताक्लॉज आणि इंग्रजी कॅरोल्स हेच चित्र डोळ्यासमोर येते.
मात्र अनेकांना माहिती नाही की मराठी भाषेतही नाताळासाठी खास अशी सुंदर, भावपूर्ण आणि परंपरागत कॅरोल्स म्हणजेच नाताळगीते लिहिली गेली आहेत. ही गीते काल-परवाची नसून 1800 च्या काळात लिहिलेली असून त्यामागे मोठा सांस्कृतिक वारसा आहे. मराठीतील ही नाताळगीते प्रामुख्याने कवी नारायण वामन टिळक यांनी लिहिली आहेत. नारायण वामन टिळक हे केवळ उत्तम कवीच नव्हते, तर ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासोबत विविध सामाजिक व वैचारिक चळवळींमध्ये सक्रिय होते.
advertisement
नारायण वामन टिळक यांनी लिहिलेली कविता, गीते आणि साहित्य मराठी संस्कृतीचा मौल्यवान ठेवा आहे. नाताळासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांचा स्वतंत्र संग्रहही उपलब्ध असून त्यातील अनेक गीते एकेकाळी मोठ्या प्रमाणात गायली जात होती. मात्र काळाच्या ओघात ही परंपरा हळूहळू लोप पावत चालली आहे. आज नाताळ म्हटलं की इंग्रजी गाणीच अधिक ऐकू येतात, तर मराठी नाताळगीते अनेकांना माहितीच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन अनुराग वाघमारे आणि आनंद जाधव या दोन तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
advertisement
अनुराग वाघमारे आणि आनंद जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठीतील ही नाताळगीते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. त्यांनी या पारंपरिक मराठी कॅरोल्सचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि व्ह्यूज मिळत आहेत.मात्र हे सर्व केवळ व्ह्यूजसाठी नसून, मराठी संस्कृती, मराठी साहित्य आणि विविध धर्मांशी जोडलेला आपला सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचावा, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
advertisement
नाताळाच्या काळात “जिंगल बेल” गाण्याइतकीच मराठी नाताळगीतेही गायली जावीत, लोकांनी ती ऐकावीत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे.या व्हिडिओंच्या माध्यमातून ते केवळ गाणी सादर करत नाहीत, तर नारायण वामन टिळक यांचे कार्य, त्यांनी लिहिलेले साहित्य आणि मराठी नाताळगीतांची परंपरा याची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. विस्मरणात चाललेल्या या साहित्याला नव्याने उजाळा देण्याचे महत्त्वाचे काम या तरुणांकडून घडत आहे.
advertisement
डिसेंबरच्या आनंदी वातावरणात नाताळ साजरा करताना, इंग्रजी कॅरोल्ससोबतच मराठी नाताळगीतांनाही स्थान मिळावे आणि आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपली जावी, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Christmas 2025: 'जिंगल बेल' महाराष्ट्रीयन तरुणांची कमाल, नाताळासाठी मराठीत तयार केली गाणी!









