जगभरात मुंबईची बदनामी करणारे 'ते' बिहारी, परदेशी तरुणीची छेड काढणाऱ्यांना शिकवला धडा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर मुंबईबाबत अनेक वाईट कमेंट येत होत्या.
मुंबई: मुंबई हे केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. मात्र, काही विकृत लोकांमुळे मुंबईच्या प्रतिमेला जागतिक स्तरावर तडा जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महालक्ष्मी येथील प्रसिद्ध 'धोबीघाट' परिसरात एका परदेशी तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना आगरीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे बिहारचे रहिवासी असून ते कामाच्या शोधात मुंबईत आले होते.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक परदेशी तरुणी महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात फिरताना दिसत होती. यावेळी दोन तरुणांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संबंधित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण केवळ तिची छेड काढून थांबले नाहीत, तर तब्बल 15 मिनिटे तिचा पाठलाग करत होते. सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ते वारंवार तिच्या जवळ जाण्याचा आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. तरुणीने त्यांना वारंवार हटकले, विरोध केला, मात्र त्यांनी तिचे ऐकले नाही. अखेर या तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
advertisement
जागतिक स्तरावर उमटले पडसाद
हा व्हिडिओ केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. जागतिक स्तरावर मुंबईच्या सुरक्षिततेबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्याने पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलीस आयुक्त स्तरावरून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.
आगरीपाडा पोलिसांचा तपास
आरोपींची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आगरीपाडा पोलिसांनी तात्काळ विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान निष्पन्न झाले की, हे दोन्ही तरुण मूळचे बिहारचे असून मुंबईत मजुरी करण्यासाठी आले होते. त्यांच्या या एका कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची मान शरमेने खाली गेली आहे.
advertisement
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
धोबीघाट, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या पर्यटन स्थळांवर परदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईत पाहुण्यांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईद्वारे पोलिसांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 7:43 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
जगभरात मुंबईची बदनामी करणारे 'ते' बिहारी, परदेशी तरुणीची छेड काढणाऱ्यांना शिकवला धडा










