चहा प्यायली अन् तोल गेला, मुंबईत अकराव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: मुंबईतील पवई परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका 27 वर्षीय महिलेचा ऑफिसच्या अकराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईतील पवई परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका 27 वर्षीय महिलेचा ऑफिसच्या अकराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. संबंधित महिला इमारतीच्या आपत्कालीन खिडकीजवळ उभं राहून चहा पित होती. यावेळी अचानक तोल गेल्याने महिला थेट अकराव्या मजल्यावरून खाली कोसळली. या दुर्घटनेच महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झिनल व्होरा असं या महिलेचं नाव आहे. त्या न्यूयॉर्क स्थित इन्शुरन्स कंपनी मार्श अँड मॅकलेनमध्ये काम करत होत्या. घटनेच्या दिवशी 9 जानेवारीला त्या ऑफिसच्या अकराव्या मजल्यावर आपत्कालीन खिडकीजवळ चहा पित उभ्या होत्या. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या दहाव्या मजल्याच्या गार्डन परिसरात कोसळल्या. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ऑफिसच्या सहकाऱ्यांनी तातडीने झिनल यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
पण तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी झिनल यांना आयसीयूमध्ये दाखल करत उपचार सुरू केले. पण याचा काहीही फायदा झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी झिनल यांची प्राणज्योत मालवली. झिनल यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या तीनच वर्षात त्यांचा संसार मोडला आहे. अशाप्रकारे झिनल यांचा मृत्यू झाल्याने मित्र परिवार आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
advertisement
झिनल यांचा भाऊ वैभव व्होरा याने कंपनीवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. आपत्कालीन खिडकीला कुलूप लावण्यात आलं नव्हतं आणि अशी घटना कशी घडू शकते? हे एक गूढ आहे, असा संशय भाऊ वैभव याने व्यक्त केला आहे. इमारतीच्या एकाही मजल्यावर सीसीटीव्ही नाहीत, ही सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे. भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी कंपनीने सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2025 10:05 AM IST