असाही एक योगायोग, राम मंदिराशी संबंधित चौघांना पद्म पुरस्कार, कुणाकुणाचा सन्मान? वाचा...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ram Temple Related Padma Awardees : केंद्र सरकारने शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. ज्या 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, त्यातील चार जण हे राम मंदिराशी संबंधित आहेत.
दिल्ली: केंद्र सरकारने शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 139 दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यातील 7 जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्या 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, त्यातील चार जण हे राम मंदिराशी संबंधित आहेत.
यात राम मंदिर चळवळीतल्या आग्रणी साध्वी ऋतंभरा, राम मंदिराचे मुख्य शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा, वैदिक विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड आणि राम मंदिर ट्रस्टचे सदस्य किशोर कुणाल यांचा समावेश आहे. या चारही जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. चौघांनाही सामाजिक कार्य, वास्तुकला आणि साहित्य या श्रेणीत पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्यावर राम मंदिराच्या अभिषेकासाठी मुहूर्त ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ते राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा असलेल्या दुर्गा वाहिनीच्या संस्थापक साध्वी ऋतंभरा यांनाही पद्मश्री देण्यात आला आहे. साध्वी ऋतंभरा यांनी 1989-90 मध्ये राम मंदिर बांधण्याच्या आंदोलनात ज्वलंत भाषणे देऊन चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
advertisement
तर चंद्रकांत सोमपुरा हे गुजरातमधील मंदिर बांधणाऱ्या कुटुंबातून येतात. देशभरात २०० हून अधिक मंदिरांच्या बांधकामात सोमपुरा कुटुंबाची भूमिका आहे. गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत देखील या कुटुंबाचा हात आहे. वेदांचे प्रसिद्ध विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्यावर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनातही सहभागी होते. याशिवाय राम मंदिर ट्रस्टचे सदस्य किशोर कुणाल यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलंय.
Location :
Delhi
First Published :
January 26, 2025 9:05 AM IST
मराठी बातम्या/देश/
असाही एक योगायोग, राम मंदिराशी संबंधित चौघांना पद्म पुरस्कार, कुणाकुणाचा सन्मान? वाचा...